Monday, October 20, 2025
Happy Diwali

मे महिन्याची सुट्टी कागदावरच; शिक्षक गुंतले कामामध्ये

मे महिन्याची सुट्टी कागदावरच; शिक्षक गुंतले कामामध्ये

मुंबई (प्रतिनिधी) : संच मान्यता तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती घेण्याच्या कामात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वेळापत्रकानुसार शिक्षकांना देण्यात आलेली मे महिन्याची सुट्टी शैक्षणिक कामात जात असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना या समान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शैक्षणिक वेळापत्रकानुसार एप्रिल महिन्यात परीक्षा संपते आणि मे महिना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येते. त्यामुळे मे महिन्यात शिक्षक आपल्या कुटुंबासोबत बाहेर गावी फिरायला जातात. मात्र यंदा सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून आदेश देण्यात आले आहे. त्या माहितीनुसार संच मान्यता तयार करण्यात येणार आहे आणि शाळांना त्या पद्धतीने अनुदान तसेच पद देण्यात येणार आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरली नसल्यामुळे शिक्षकांना ही माहिती भरण्यासाठी मे महिनाच्या म्हणजेच सुट्टीच्या दिवशी शाळेत यावे लागत आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी गावी गेले असल्यामुळे त्यांची माहिती शोधण्यात शिक्षकांना पूर्ण दिवस द्यावा लागत असल्याचे समजते. शैक्षणिक वेळापत्रकानुसार मे महिन्यात शिक्षकांना सुट्टी असते. मात्र शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती शोधण्याची सूचना देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने आधीच माहिती गोळा केली असती, तर शिक्षकांची हक्काची सुट्टी वाया गेली नसती, असे एका मुख्याध्यापकाने नमूद केले. ‘शिक्षकांनी वर्षभरात कोणकोणते नवीन उपक्रम राबविले’, यांची माहितीही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये उपक्रमाचे उद्दिष्ट, थोडक्यात तपशील, कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांना झालेला लाभ आदींची माहिती शिक्षण विभागाला द्यायची आहे’, असेही एका मुख्याध्यापकाने सांगितले.

Comments
Add Comment