कणकवली: २ हजार रुपयांच्या नोटांवरुन सरकारवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करणाच्या सरकारच्या निर्णयानंतर लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी मातोश्रीवर सतत का जात आहेत असा खडा सवालच त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, कर्जतच्या फार्म हाऊसची जमीन जेसीबीने खोदून काढली पाहिजे. कर्जतच्या फार्म हाऊसच्या जमिनीखाली देशभरातील २ हजाराच्या अर्ध्या नोटा सापडतील असा आरोपच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. रोखठोकमध्ये काळ्या पैशांवरुन केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि ते म्हणाले, तुझ्या मालकाच्या फार्महाऊसवर २ हजार रुपयांची किती झाड लावली आहेत ते बघ आणि मग आमच्यावर टीका कर. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर टीका करणाऱ्यांना एका वाक्यात सांगतो, मातोश्रीचा पोपट मेलेला आहे आमचं सरकार टीकलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही जितक्या लवकर लक्षात घ्याल तितकं चांगलं आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी लवकरच माहिती देणार
यावेळी नितेश राणे यांनी एक महत्वाचा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, नंदकिशोर चतुर्वेदी लवकरच एक गौप्यस्फोट करणार आहेत. संजय राऊत यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे किती काळापैसा ठेवलाय याचा हिशोब द्यावा. ज्यादिवशी नंदकिशोर चतुर्वेदी भारतात येईल आणि सत्य सांगेल तेव्हा समजेल की काळ्या पैश्याचा दलाल कलानगरमध्ये बसलेला आहे.