अनिरुद्धला दोन बहिणी व तो एकटा, आणि वयोवृद्ध आई असे सर्वजण मुंबईमध्ये राहत होते. दोन बहिणींची लग्न झाल्यावर अनिरुद्ध आणि त्याची आई असे दोघेजणच राहत होते. अनिरुद्ध हा उच्च शिक्षित तरुण असल्याने. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षा दिल्यानंतर त्याला डिफेन्समध्ये नोकरी लागलेली होती. सरकारी नोकरी उच्चशिक्षित त्याच्यामुळे तो आता रुबाबात राहू लागला होता. त्याच्या दोन्ही बहिणी त्याला लग्न कर असं सतत सांगत होत्या. पण त्याचं म्हणणं होतं की, आधी व्यवस्थित सेटल व्हायचं आणि मगच लग्न करायचं. पण कोरोना काळामध्ये त्याची आई गेली आणि आता अनिरुद्ध एकटा पडला होता. दोन्ही बहिणींकडे तो आलटून-पालटून राहायला लागला होता. आता तर बहिणी त्याच्या मागेच लागल्या होत्या, त्याच्या आईला एक वर्ष होण्याच्या अगोदर तू लग्न उरकून घे. नाहीतर तुला तीन वर्षे लग्न करता येणार नाही.
अनिरुद्धनेही मनावर घेतलं की, किती दिवस आपण बहिणीकडे राहणार. नात्यातीलच मुलगी त्याला पसंत पडली. मुलगी गावाकडे तालुक्यात आपल्या कुटुंबासह राहत होती. मुलीच्या बहिणीचे पती सरकारी कर्मचारी होते. मुंबईत अनिरुद्धची चौकशी करायला आले व तो ज्या ठिकाणी काम करत होता, त्या डिफेन्समध्ये ते गेले. त्यांना समजलं की, अनिरुद्ध येथे कामाला आहे. पण डिफेन्स म्हणजे नेमकं काय असतं. तिथे तो नेमकं काय काम करतो हे त्यांना बघायचं होतं. डिफेन्समध्ये आतमध्ये प्रवेश त्यांना दिला जात नव्हता. म्हणून अनिरुद्धने आपल्या ऑफिसरशी बोलून त्यांना आपल्या कार्यरत असलेल्या ठिकाणी प्रवेश मिळवून दिला. तेथील कर्मचारी त्यांना बोलू लागले तुम्ही नशीबवान आहात की, तुम्हाला सरकारी जावई मिळतोय. म्हणजेच अनिरुद्धची मुंबईत येऊन पूर्ण चौकशी मुलीच्या लोकांनी केली. त्यामुळे अनिरुद्धने मुलीची लोकं एवढी चौकशी करतात म्हणजे मुलगी चांगली असणार, असा ग्रह आपल्या मनाकडे धरला. मुलीकडच्या लोकांचे म्हणणं आमच्या गावाकडेच लग्न करायचं. पूर्ण लग्नाचा खर्च आम्हीच करणार, असं त्यांनी ठणकावून अनिरुद्धला सांगितलं. या गोष्टीला तयार झाला. त्यामुळे अनिरुद्ध आणि त्याच्या बहिणी गावाकडे लग्न करायला तयार झाले. लग्नाची तारीख फिक्स झाली. अनिरुद्ध आणि त्याचे कुटुंब गावाकडे रवाना झाले. लग्नकार्य व्यवस्थित पार पडलं. अनिरुद्ध यांच्या बहिणीला मुलगी खूपच आवडली होती. पुढील विधी व्यवस्थित पार पडले. लग्नानंतर अनिरुद्ध व त्याची पत्नी क्षमा एकत्र आले. तेव्हा क्षमाने अनिरुद्धला आपल्या जवळ येऊ दिलं नाही. अनिरुद्धला वाटलं लाजरी आहे, असं होत असेल म्हणून त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवस गावाकडे राहिल्यानंतर नातेवाइकांकडे व देवधर्म फिरल्यानंतर. ती आपल्याशी व्यवस्थित वागेल, असं अनिरुद्धला वाटलं. गावाकडची असल्यामुळे बिचारी साधीभोळी आहे, असा तो विचार करत होता. अनिरुद्ध याने क्षमाच्या घरातल्या लोकांना आता लग्नकार्यविधी नातेवाईक देवधर्म सर्व झालेला आहे. आता आम्ही मुंबईला निघतो, असं सांगितलं. तेव्हा मात्र क्षमाने मुंबईला येण्यास नकार दिला. तेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी अनिरुद्धची समजूत घातली. थोडे दिवस जाऊ दे, आम्ही तिला मुंबईला घेऊन येऊ. तिला कदाचित मुंबई या शहराची भीती वाटत असेल म्हणून ती यायला तयार नाही, अशी समजूत घातली. अनिरुद्धने ही गोष्ट मान्य केली. लग्नानंतर मुंबईला येताना एकटाच त्याने गृहप्रवेश केला. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर सासुरवाडीच्या लोकांकडे क्षमाला कधी न्यायाला यायचं? असं विचारलं असता अजून थोडे दिवस जाऊ दे, तिच्या मनाची तयारी झालेली नाहीये, असं त्याला उत्तर मिळत गेलं. अनिरुद्धला नेमका काय प्रकार आहे ते समजेना. मुंबईला यायला तयार का नाही, या गोष्टीचा उलगडा काही अनिरुद्धला होत नव्हता. अनिरुद्धने क्षमाला या गोष्टीबद्दल विचारले असता. ती म्हणाली, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे म्हणून मी येथे राहते. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला येईन. पण लग्न ठरताना ही गोष्ट तिच्या माहेरच्यांनी किंवा तिने का सांगितली नव्हती. लग्न झाल्यानंतर ते लोक असं का सांगताहेत, याचाही उलगडा अनिरुद्धला होत नव्हता. नंतर क्षमाने मी मुंबईला येईन, पण शिक्षण घेण्यासाठी. थोडे दिवसच राहीन आणि मला तुमच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे, असं सरळ सरळ अनिरुद्धला सांगितलं. अनिरुद्धच्या पायाखालची जमीनच सरकली. विचार करत होता, काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून क्षमा मुंबईला येत नाही. पण तिच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर त्याला नेमकं काय करायचं हे समजेना. आम्ही दोघे एकत्र राहिलो नाही, आम्हाला दोघांचे स्वभाव माहिती नाहीत, ती माझ्या घरात आली सुद्धा नाही आणि तिला घटस्फोट कुठल्या कारणासाठी हवाय, याचा उलगडा काही अनिरुद्ध व त्यांच्या बहिणींना होईना.
लग्नाच्या वेळी नातेवाइकांचे काही फोन घेतले होते. त्यांना संपर्क साधल्यावर अनिरुद्धला असं समजलं की, क्षमाचे एका दुसऱ्याच मुलाशी लग्नाअगोदरपासून प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण अनिरुद्धची सरकारी नोकरी बघून घरच्या लोकांनी तिचं अनिरुद्धशी लग्न लावून दिलं होतं आणि आता क्षमा नागपूरमध्ये राहत असून तिथे ती नोकरी करत आहे, असं अनिरुद्धला समजलं. आणि क्षमाचे ज्या मुलावर प्रेम होते, तोही नागपूरमध्येच राहतो, असे अनिरुद्धला चौकशी केल्यानंतर समजले. अनिरुद्धने या सगळ्या गोष्टींचा जाब क्षमाच्या घरातल्या लोकांना विचारला. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. आमच्या मुलीचे कुठल्याच मुलाशी काही संबंध नव्हते. उलट तुम्हीच लग्न झाल्यावर तिच्याशी व्यवस्थित वागला नाहीत. तुमच्या बहिणी तिला टोमणे देऊन बोलत होते. म्हणून मुंबईला येण्याची तिला भीती वाटत होती. म्हणून ती मुंबईला राहण्यास येत नाही, असे उलट आरोप अनिरुद्धवरच क्षमाच्या घरातील लोक करू लागले.
अनिरुद्धला कळून चुकलं होतं की, क्षमाचं आपल्याशी लग्न लावून देण्यात आलं. त्याची घोर फसवणूक करण्यात आली होती. लग्नानंतर मुलगी सासरी नांदायला जाईल, असा मुलीच्या घरातला लोकांचा विश्वास होता. मुलीने त्या विश्वासाला तडा देऊन नांदायलाच आली नाही. घरच्यांच्या विरोधात जाऊन ती आता नागपूरमध्ये नोकरी करत आहे व आपल्या प्रियकरासोबत ती तिथे राहत आहे. याची जराही कल्पना क्षमा किंवा तिच्या घरातल्या लोकांनी अनिरुद्धला होऊ दिली नाही. त्याची फसवणूक करण्यात आली. हाच विरोध क्षमाने लग्नाच्या वेळी दाखवला असता, तर अनिरुद्धचे आयुष्य बरबाद झालं नसतं. क्षमा नको ते आरोप अनिरुद्धवर करणार नाही ना, अनिरुद्ध आणि त्याच्या नोकरीवर परिणाम होणार नाही ना, हा विचार त्याच्या बहिणी करत आहेत. अनिरुद्धने क्षमाला घटस्फोट देण्याचा ठरवलेला आहे व तो तिच्या घरच्यांच्या विरुद्धात केस करण्यासाठी तयार आहे. लग्नाच्या बाजारात अनिरुद्ध सोबत जुगार खेळला गेला. या जुगारांमध्ये अनिरुद्ध फसला गेला आणि हरलाही गेला.
(सत्य घटनेवर आधारित)
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…