-
दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आपल्यापैकी प्रत्येकाची काही ना काही स्वप्ने असतात. काहीतरी करण्याची ऊर्मी असते. कोणाला खेळाडू बनायचं असतं, कोणाला कलाकार, तर कोणाला नृत्यांगना. मात्र संसाराच्या गाड्यात आणि नोकरीच्या चक्रात ती सारी स्वप्नं उरामध्येच राहतात. तिने मात्र नोकरीचा अडथळा आपल्या स्वप्नांमध्ये येऊ दिला नाही. गलेलठ्ठ पगाराची आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली. आणि संपूर्णपणे अनोळख्या अशा हॉटेल क्षेत्रात आली. विशेष म्हणजे निव्वळ भारतातच नव्हे, तर परदेशात देखील तिच्या हॉटेलचा आज बोलबाला आहे. ते हॉटेल म्हणजे पूर्णब्रह्म आणि ही गोष्ट आहे, पूर्णब्रह्मच्या संचालिका जयंती कठाळे यांची.
जयंती मूळची नागपूरमधली. एकत्र कुटुंबात वाढलेली. तिला लहानपणी बाहुल्यांशी खेळण्यात किंवा मुलीसारखी कामे करण्यात रस नव्हता. तिला फुटबॉल खेळण्याची आवड होती. तिची आई नोकरदार महिला होती. तिचे नियम जयंतीला काटेकोरपणे पाळावे लागे. जयंतीचे वडील तिचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक होते. त्यांनी तिला जिम्नॅस्टिक आणि पोहणे शिकवले. ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देखील होती. जयंतीला घरातील काम करायला आवडत नसले तरी सेवा करणे आणि सहभोजन (एकत्र खाणे) करण्याचा प्रयत्न करणे ही तिची आवड होती. तिच्या कॉलनीत सगळे सण उत्साहाने साजरे करत. सणासुदीला कॉलनीतले जवळपास १००० लोक एकत्र स्नेहभोजन करत. जयंती कुटुंबातील आणि कॉलनीतील इतर मुलांसोबत जेवण वाढण्याचे काम करी. खऱ्या अर्थाने जयंतीला स्वयंपाक शिकवला ते तिच्या आजीने. तोंडाला पाणी सुटेल, असे सुग्रास जेवण जयंती तयार करू लागली. तिची आजी शासकीय विद्यालयात मुख्याध्यापिका होती. ज्या काळात महिलांना नोकरीसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी नसे, त्याकाळी आपली आजी मुख्याध्यापिका आहे, याचे जयंतीला फारच कौतुक होते. तिची आजी शाळेतील नोकरी सांभाळून एवढं मोठं कुटुंब देखील हसतमुखाने सांभाळायची. ‘तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता’ असं सांगणारी आजी जयंतीसाठी मोटिव्हेशनल होती.
जेव्हा जयंती कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेली होती, तेव्हा तिच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते घरी शिजवलेले मराठी जेवण शोधणे. तिला फक्त स्थानिक भारतीय कुटुंबांकडून घरगुती जेवण मिळू शकले. ‘डॉलर्स जेब मे हैं, लेकीन खाने को कुछ नहीं हैं. ही जणू तिची टॅगलाइन बनली’ भारतात परत आल्यावर कठाळे यांनी मराठी पदार्थ सर्वत्र उपलब्ध व्हावेत यासाठी काहीतरी करायचे ठरवले. एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्फोसिसमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि मोदक विकायला सुरुवात केली. जास्त पगाराची नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू करणे हा सोपा निर्णय नव्हता. मुख्य समस्या ही भांडवल आणि अन्न उद्योग व्यवस्थापनाची होती. हे क्षेत्र जयंतीसाठी नवीन होते. आपलं हॉटेल वाढेल आणि प्रत्येक खाद्यपदार्थ लोकांना आवडेल, अशी तिने कल्पना देखील केली नव्हती.
२०१२ मध्ये, बंगलोरमध्ये तिचे पहिले रेस्टॉरंट उघडले. पहाटे उठून घरातला स्वयंपाक आटोपून जे कुक आहेत त्यांना मराठी अन्नपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, त्यानंतर ऑफिसला जाणे. संध्याकाळी ऑफिसहून घरी आले की, मुलांना काय हवंय नको ते पाहणे. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये जाणे. अशी कित्येक दिवस कष्टप्रद दिनचर्या जयंतीची होती. मराठी पदार्थ हे पोहे आणि वडापाव एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, याची जाणीव जयंतीला लोकांना करून द्यायची होती. अशा प्रकारे ‘पूर्णब्रम्ह’ आकाराला आले. जयंतीला रेस्टॉरंट्सची जागतिक साखळी उघडण्याची आशा आहे. जेणेकरून लोक अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतील.
तिला ग्राहकांना महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाच्या नवीन चवीची ओळख करून द्यायची आहे. जयंतीने तिच्या सर्व रेस्टॉरंटमध्ये घरगुती वातावरण तयार केले आहे. इथली आसनव्यवस्था खूपच वेगळी आणि आकर्षक आहे. इथे ग्राहक जमिनीवरील गालिच्यांवर किंवा लाकडी आसनांवर बसतात. ‘मी पाहिलं होतं की, बहुतेक लोकांना जमिनीवर बसून अन्न खायला आवडतं, अगदी तरुणांनाही.’ जयंती सांगते. नाकात नथ आणि नऊवारी पैठणी असा जयंतीचा पारंपरिक मराठी पेहराव सर्वार्थाने तिचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवतो. पूर्णब्रह्म रेस्टॉरंटला भेट देणं ही एक पर्वणीच असते. रेस्टॉरंट सुंदर रांगोळ्यांनी सजवलेले आहे. अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले जाते. सर्व वयोगटातील लोकांच्या भोजनाची येथे पूर्तता केली जाते. इथल्या मेनूमध्ये तब्बल १८५ डिशेस आहेत. धातू किंवा चांदीच्या थाळीमध्ये अन्न दिले जाते. “चौरंग” मांडलेला असतो त्यावर थाळी अन् वाट्या ठेवल्या जातात. बंगळूरु, पुणे, संभाजी नगर, ठाणे, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी पूर्णब्रह्मच्या शाखा आहेत.
‘आम्ही आमचा मेनू ४ विभागांमध्ये विभागला आहे : बाळगोपाल (मुले), गर्भवती महिला, वृद्ध आणि सामान्य. जर ग्राहक अन्न वाया घालवत नाहीत, तर आम्ही त्यांना ५ टक्के सवलत देतो आणि जर त्यांनी तसे केले, तर आम्ही त्यांच्याकडून २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारतो.’ जयंती कठाळे सांगतात. आपल्या समाजात, विशेषतः रूढीवादी कुटुंबात, तुम्ही जे काही कराल, त्यापुढे नेहमीच प्रश्नचिन्ह असते. त्यांच्या मते लग्न हे करिअर नव्हे, तर मुलीच्या आयुष्याचे ध्येय असले पाहिजे. जयंतीच्या वडिलांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला आहे. जयंतीची आयटीमधील भरपूर पगाराची नोकरी सर्वांच्या दृष्टीने चांगली होती. पण जेव्हा तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनाच शंका आली. सगळ्यांना ती चुकीची वाटली. मात्र जयंतीने त्यांना चुकीचे सिद्ध केले. या सगळ्या प्रवासात आई, बाबा, आजी, पती या सगळ्यांनी खंबीर पाठिंबा दिला. अजून एकजण आहे जो नात्यागोत्यातला नाही, पण तो सख्ख्या दिरासारखा पाठीशी ठाम उभा राहिला तो म्हणजे संदीप गढवाल. संदीपने व्यावसायिक प्रवासात सार्थ साथ दिली. संदीप कंपनीच्या संचालक मंडळाचा सर्वात तरुण संचालक आहे. ‘नऊवारी अशीच कायम परिधान करा, तुमची नऊवारी ट्रेंड बनेल.’ संदीपनेच हे भाकीत वर्तवलं होतं. कोणत्याही स्त्रीने स्वतःला एका चौकटीत अडकवून घेऊ नये. प्रत्येक स्त्रीमध्ये क्षमता आहे. जिने ती ओळखली व क्षमतेला कृतीची जोड दिली, ती खऱ्या अर्थाने लेडी बॉस ठरली. जयंती कठाळे या खऱ्या अर्थाने ‘लेडी बॉस’ आहेत.