-
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
सुट्टीची गंमत काय असते, हे कळायला लहान असायला हवे. रोज शाळेत जाताना आपण किती उत्सुकतेने सुट्टीची वाट पाहात असायचो. विशेष म्हणजे मोठ्या सुट्टीची. किती बेत, किती स्वप्ने. मी पालक झाले आणि मुलांच्या सुट्टीचा अर्थ अधिक उलगडला. ज्या पालकांना श्रीमंती थाटात मुलांच्या सुट्ट्यांची आखणी शक्य असते, ते महागड्या क्लासेसमध्ये मुलांना अडकवून मोकळे होतात.
व्यक्तिमत्त्व विकासाची गरज सर्वच मुलांना असते. मात्र तशी संधी सर्वांनाच मिळते, असे नाही. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आमच्या विद्यार्थ्यांची शिबिरे दिवाळी नि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये व्हायची. ही शिबिरे शक्यतो ग्रामीण भागात किंवा मग महानगरपालिकेच्या वा छोट्या मराठी शाळांमधून व्हायची. मुलांचा नि विद्यार्थी कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह. आमचे विद्यार्थी मराठी बालगीते, कविता शोधून काढायचे. माणगाववाडीच्या मुलांना समूहगीते फार आवडत. एका तालासुरात मुले मिळून गाणी म्हणत.
विद्याविहारची राजावाडी महानगरपालिका शाळा, कांजूरमार्गची सरस्वती विद्यालय या शाळांमधली शिबिरे हमखास यशस्वी व्हायची. बालनाट्याची तयारी जोरदार सुरू व्हायची. घोषवाक्ये, निबंध, तक्ते या सर्वातील सहभागाकरिता मुलांची चढाओढच लागायची. निर्मिती शीलतेची त्या मुलांची ओढ या शिबिरांमधून परिपूर्ण व्हायची. मराठी अभ्यासकेंद्रातर्फे आम्ही ठाण्यात ‘स्वच्छंद’ नामक मुलांसाठीचा उपक्रम चालवला होता. या उपक्रमात एकदा अनंत भावे सरांना आमंत्रित केले होते. सरांनी कितीतरी शाळांमध्ये त्यांच्या कवितांचे कार्यक्रम सादर केले आहेत.
कासव चाले हळू… त्याच्या पायाला झाले गळू…
अशी कासवाची कविता सर त्यांच्यासोबत मुलांनाही म्हणून दाखवायला सांगायचे. सरांच्या कवितांमधला विनोद मुलांना अचूक समजायचा. खारुताई, ससा, वेगवेगळी झाडे, पाऊस असे कितीतरी विषय त्यांच्या कवितांमध्ये लपलेले होते. मुलांसाठीची अशी छंदशिबिरे आमच्या विजया वाड बाईही आयोजित करायच्या. बालनाट्य, कथांचे अभिवाचन, कवितांचे सादरीकरण अशा अनेक गोष्टींमुळे ही शिबिरे रंजक होत. मुलांच्या भाषेची जडणघडण या शिबिरांमधून सहज साध्य होई.
सुट्टीतील सहलींवर वारेमाप खर्च करणारे अनेक पालक मुलांना एकतरी बालनाट्य पहायला नेतात का? बालनाट्य हा खास मुलांसाठीचा नाट्यप्रकार मराठीत अजून टिकून आहे. आविष्कारच्या ‘दुर्गा झाली गौरी’ने बालनाट्याच्या जगात नवा विक्रमच घडवला. संगीत, नृत्ये, गीते या सर्वांनी नटलेले हे सर्वांगसुंदर बालनाट्य. मुलांसोबत मोठ्यांनाही मनमुराद आनंद देणारे!
राजाराणीला घाम हवा, इवलू टिवलू, चिंगी चिंगम बबली बबलगम ही आणि छोट्या-मोठ्या अनेक नाट्यसंस्थांची शिबिरांमधून आकाराला आलेली बालनाट्ये हा नक्कीच मुलांकरिता मनोरंजनाचा खजिना आहे. अजून एक खजिना मुलांकरिता आपण सुट्टीत आवर्जून खुला केला पाहिजे. तो म्हणजे मुलांसाठीची पुस्तके. ज्योत्स्ना प्रकाशनने तर असंख्य प्रकारची पुस्तके मुलांकरिता प्रकाशित केली. नॅशनल बुक ट्रस्टच्या रंगीत पुस्तकांचा मोह तर सहज कुणालाही पडावा. वाचनसंस्कृतीबद्दल नेहमीच खूप बोलले जाते. मुलांच्या हाती जर आज पालकांनी पुस्तके दिली, तर उद्याचे वाचक घडतील. पण ते जाणीवपूर्वक घडवणे ही पालकांची नि शाळांची जबाबदारी आहे.