देव म्हणजे...



  • संवाद: गुरुनाथ तेंडुलकर



परमेश्वर चित्तात धारण केला की, त्याच्याशी संवाद साधता येतो आणि देव केवळ बोलतच नाही, तर आणखीही बरंच काही करतो.


स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातील एक प्रसंग...


स्वामीजी भारतभ्रमण करीत असताना एकदा अलवार प्रांतात पोहोचले. अलवार प्रांताचे त्या काळचे महाराज मंगलसिंग म्हणजे मोठी आसामी होती. श्रीमंत, सुशिक्षित आणि सुसंस्कृत देखील. त्यांनी राज्यात अनेक विद्वान पंडितांना आश्रय दिला होता. राज्यातील लेखक, कवी, कलाकार आणि गायक वादकांच्या कलेची मंगलसिंग महाराजांना कदर आणि कौतुक होतं.


स्वामी विवेकानंदांचं अलवार प्रदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. महाराजांनी स्वामीजींना आपल्या प्रजाजनांसमोर ज्ञानाच्या चार गोष्टी सांगण्याची विनंती केली. दुसऱ्याच दिवशी दरबारात स्वामीजींचं प्रवचन झालं. त्यात स्वामीजींनी हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान आणि त्यातील काही रूढी-परंपरांवर मार्मिक भाष्य केलं. ‘जुनं ते सगळंच सोनं नसलं तरी जुनं ते सगळंच टाकाऊ देखील नसतं.’ हे अनेक उदाहरणांनी सप्रमाण सांगितलं. स्वामीजींच्या तोंडून जणू साक्षात सरस्वतीच बोलत होती. सर्व सभा तटस्थ झाली होती. स्वतः महाराजदेखील भारावून गेले होते. त्या श्रोतृवर्गात कुणी एक स्वतःला विद्वान समजणारा अर्धवट माणूस होता. त्याला महाराजांनी स्वामीजींचा केलेला हा सन्मान सहन झाला नाही आणि त्याने प्रवचन संपल्यानंतर स्वामीजींना प्रश्न विचारला.


‘स्वामीजी आपण हिंदू धर्माची तरफदारी करता. हिंदू धर्मात मूर्तीपूजेला फार महत्त्व दिलं जातं. तुम्ही आताच्या प्रवचनात देखील मूर्तीपूजेबद्दल बोललात. पण, मी विचारतो की, मूर्तीपूजा करायचीच कशासाठी? तुमचा देव काय दगडाच्या मूर्तीत राहतो की काय? की मातीच्या मूर्तीत? लाकडाच्या मूर्तीत जर देव असेल, तर ते लाकूड जळल्यानंतर देव देखील जळून जात असेल नाही का?’ प्रश्न विचारून तो माणूस छद्मीपणे हसला.


त्या माणसाचा प्रश्न ऐकून श्रोतृवर्गात चुळबूळ सुरू झाली. स्वतः मंगलसिंग महाराज देखील अस्वस्थ झाले. स्वामी विवेकानंद मात्र शांतच होते. त्यांनी आपली नजर सर्व सभागृहातून फिरवली आणि त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसावर स्थिर केली. किंचित हसले, उठून उभे राहिले आणि त्याला जवळ बोलावून घेतलं. आपल्या मागून त्याला सभागृहातून फिरायला सांगितलं. सभागृहाच्या भिंतीवर राजघराण्यातील अनेक थोरामोठ्यांच्या तस्वीरी लावल्या होत्या. मंगलसिंग महाराजांचे पणजोबा, आजोबा, वडील आणि खुद्द मंगलसिंग महाराज स्वामीजींनी मंगलसिंग महाराजांची तस्वीर भिंतीवरून
खाली उतरवायला लावली. दरबारातील नोकरांनी अतिशय काळजीपूर्वक ती तस्वीर खाली उतरवली.
स्वामीजींनी त्या प्रश्नकर्त्या माणसाला विचारलं, ‘ही तस्वीर कुणाची माहीत आहे?’


‘हो, हे आमचे मंगलसिंग महाराज.’ तो माणूस उत्तरला. ‘आता मी सांगतो तसं करा. या तस्वीरीला जोरात लाथ मारा.’
‘अं... क... काय ?’ तो माणूस गडबडला.
‘होय या तस्वीरीला जोरात लाथ मारा आणि तिच्यावर थुंका...’
कल्पनेनंच त्याला भीतीनं कापरं भरलं. संपूर्ण सभागृह रागानं स्वामीजींकडे बघत होतं. महाराज मंगलसिंगांच्या कपाळावर देखील नाराजीची आठी उमटली होती...


‘मारा लाथ... थुंका त्या तस्वीरीवर.’ स्वामीजींनी ठाम, धीरगंभीर स्वरात त्या माणसाला आज्ञा केली. भीतीनं त्या माणसाच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून स्वामीजींनी विचारलं, ही तर एक तस्वीर आहे. खरे महाराज तर इथं दरबारात उपस्थित आहेत. तुम्ही त्यांच्या तस्वीरीवर लाथ मारल्यानं त्यांना इजा थोडीच होणार आहे? की तुम्ही थुंकल्याने त्यांच्या चेहऱ्यावर शिंतोडे उडणार आहेत? ही तर एक तस्वीर आहे. साधा कागदाचा तुकडा, पण तुम्ही तुकड्यालाही प्रत्यक्ष महाराज समजता... खरं ना?’ त्या माणसाने होकारार्थी मान डोलावली. स्वामीजी पुढे म्हणाले...


हाच प्रकार आमच्या सनातन हिंदू धर्मातील मूर्तीपूजेच्या बाबतीत आहे. अवघं ब्रह्मांड व्यापून राहिलेल्या परमेश्वराचं रूप आपण पाहू शकत नाही. सर्वसामान्य माणसाचं मन एकाग्र होण्यासाठी काहीतरी निमित्त मात्र लागतं. म्हणून मूर्तीपूजा...क्षणापूर्वी बुचकळ्यात पडलेले नगरजन आनंदविभोर झाले. मंगलसिंग महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी स्वामीजींना स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवून प्रणाम केला.


अलीकडे स्वतःला सुशिक्षित आणि बुद्धिमान म्हणवून घेणारे अनेक जण आपल्या सनातन हिंदू संस्कृतीवर कुत्सित टीका करतात. मूर्तीपूजेच्या विरोधात बोलतात. त्यांना उत्तर म्हणून हा प्रसंग सांगितला. स्वामी विवेकानंदांनी त्या माणसाला जे सांगितलं ते अगदी शंभर टक्के सत्य आहे. देव कुठे असतो? याचं उत्तर एका संस्कृत


श्लोकात दिलंय.
न काटे विद्यते देव न पाषाणे
नच मृत्तिके ।
भावे हि विद्यते देव तस्मात भावो
हि कारणम् ।।


देव लाकडाच्या मूर्तीत नसतो, दगडाच्या मूर्तीत नसतो की मातीच्या मूर्तीतही नसतो. देव माणसाच्या अंतःकरणात असतो, मनात असतो. भावनेत असतो म्हणून आपण जिथे भावना ठेवू तिथे आपला देव असतो.


एकलव्यानं साधी माती कालवून त्यातून द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली. त्या मूर्तीवर श्रद्धा ठेवून धनुर्विद्येच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तो त्या मूर्तीजवळ जाऊन सूचना घ्यायचा आणि त्या सूचना अमलात आणून त्यानुसार नेमबाजीचे धडे गिरवायचा. रात्रंदिवस सराव करून एकलव्य उत्तम धनुर्धर बनला. त्याला शिकवणारे खरं तर कोण होते? गुरू द्रोणाचार्य? त्यांची मूर्ती? की एकलव्याच्या मनातील शिकण्याची


उत्कट तळमळ ?
मला सांगा मूर्तीमध्ये नेमकं काय असतं? लाकूड? दगड? धातू? की माती?


मूर्तीमध्ये असतं त्या मूर्तीची पूजा करणाऱ्याचं मन, त्याच्या भावना म्हणूनच ती निर्जीव मूर्ती त्याला सजीव भासते. तिथं साक्षात परमेश्वर उपस्थित आहे, असं मानून भक्त भगवंताशी बोलतो. एकरूप होतो. आपल्या मनातील व्यथा त्याला सांगतो. काही लोक विचारतात की, भगवंताची भाषा कोणती? तुकारामाशी मराठीत बोलणारा विठ्ठल पुरंदरदासांबरोबर बोलताना कन्नड भाषेत कसा बोलतो? मीराबाईशी मारवाडी हिंदीमधून बोलणारा श्रीकृष्ण शंकराचार्यांशी बोलताना संस्कृतमधे कसा बोलत होता?


याचं उत्तर आहे...


परमेश्वर चित्तात धारण केला की, त्याच्याशी संवाद साधता येतो आणि देव केवळ बोलतच नाही, तर आणखीही बरंच काही करतो.


गोरा कुंभाराला विठोबा माती कालवायला मदत करत होता, तर संत जनाबाईबरोबर जात्यावर बसून चक्क दळण दळत होता. नामदेवाच्या हातचा नैवेद्य खात होता, तर मीरेच्या मुखातून येणाऱ्या आर्त स्वरांनी तल्लीन होऊन डोलत होता. देवाच्या या कृतीचा मानसशास्त्रीय अर्थ शोधताना मला संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओळ आठवते.


तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणासी ।।


या दोन मनांच्या विचार मंथनातील एक मन असतं आपलं आणि दुसरं मन असतं देवाचं. या दोन मनांच्या विचार मंथनातून अनेक गूढ आणि गहन समस्यांची उकल होऊ शकते. अशक्य वाटणारी अनेक कामं अगदी सहज शक्य होतात. अनेक कठीण कठीण समस्यांची उत्तरं चुटकीसरशी सापडतात. आपल्यालाही असे अनेक अतर्क्य अनुभव येतात...


हे अनुभव आल्यानंतर आपल्याला स्वतःलाच आश्चर्य वाटतं. आपण हे कसं केलं? की, यात आपल्याला आणखी कुणाची अदृष्य मदत होती?


अशक्य कार्यात मदत करून ते शक्य करणाऱ्या त्या अदृष्य शक्तीलाच परमेश्वर असं म्हणतात. आपल्याला आपल्या कामाचा गर्व होऊ नये, यशाने हुरळून आपल्या मनात अहंभावना निर्माण होऊ नये म्हणून त्या यशाचं श्रेय देवाला द्यायचं... बहिणाबाई चौधरी त्यांच्या एका


कवितेत म्हणतात,
माझी माय सरस्वती
मले शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी
किती गुपिते पेरली


माणसाला कार्याची प्रेरणा देणारा देव, दुःखाच्या प्रसंगी धीर देणारा देव, अवघड कामात सहाय्य करणारा देव, कलावंतांच्या प्रतिभेला झळाळी देणारा देव, आजारी माणसाला वेदना सुसह्य करण्याचं सामर्थ्य देणारा देव, विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करून यश मिळवून देणारा देव... हा देव कुठेही बाहेर नसतो. तो असतो केवळ त्या प्रतिमेला मानणाऱ्याच्या मनात. मूर्ती किंवा प्रतिमा हे केवळ निमित्त असतं. पण, ते देखील तितकंच महत्वाचं असतं.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे