-
ओंजळ: पल्लवी अष्टेकर
उमलत्या वयातील मुलांनी आपले मन मोकळे केले पाहिजे. मनात कुढत राहिल्याने ही मुले नैराश्याची शिकार होऊ शकतात.
आम्ही समुपदेशक कुटुंब कल्याण केंद्रात काम करत असताना कौमुदी आपल्या आई-वडिलांसमवेत आली होती. सर्वांनाच आमच्याशी भरभरून बोलायचे होते. आपल्या व्यथा सांगायच्या होत्या. शंका-निरसन करून घ्यायचे होते. त्यासाठी आम्ही आधी कौमुदीच्या पालकांना चर्चेसाठी बोलावले. फार आढे-वेढे न घेता तिची आई आमच्याशी बोलू लागली, “ताई, आम्हाला दोन मुली! मोठी कौमुदी धाकटी श्रुतिका!
कौमुदी यंदा कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे व श्रुतिका अकरावीत! दोन मुलींना तळहाताच्या फोडासारखे जपायचे म्हणजे चेष्टा नाही. त्यांचे कॉलेजचे वय! मित्र-मैत्रिणींत हसून-खेळून जगायचे वय! त्यामुळे ऊठ-सूठ आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. तरीही त्यांचे पालक म्हणून आम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे. फक्त होते काय, कौमुदी अलीकडे सारखी मैत्रिणींसोबत चित्रपटाला जाते. जाताना ती आम्हाला सांगून जाते. पण, तरीही आमचे म्हणणे की, तिने करिअरकडे अधिक लक्ष द्यावे. पुढे आम्ही तिला सी.ए.च्या परीक्षांना देखील बसविणार आहोत. नटावे-थटावे, चित्रपट पाहावेत, पण माफक प्रमाणात. हॉटेलिंगसुद्धा भरपूर सुरू असते कौमुदीचे. मग श्रुतिका समोर हाच आदर्श राहणार का? याची जाणीव कौमुदीने ठेवायला हवी.” आई म्हणाली.
वडील काहीसे अस्वस्थ होत म्हणाले, “काय करायचे? मी कधी दोन शब्द बोलायला गेलो, तर यांची भांडणे सुरूच. म्हणून मी शांत बसून राहतो. हळूहळू परिस्थिती सुधारेल याची वाट पाहत.’’
मग आम्ही कौमुदीशी बोलायचे ठरविले. ती म्हणाली, “आई-बाबा तुम्हाला काय सांगणार ते मला माहीत आहे. मी अभ्यास करीत नाही, भरपूर सिनेमे पाहते. फॅशन करते. पण, माझे म्हणणे घरात कुणी ऐकून घेत नाही. मला आधुनिक काळाबरोबर जगायचे आहे. त्यात मी माझ्या वैचारिक स्वातंत्र्यालाही तितकेच महत्त्व देते. चांगल्या मार्कांनी मी दरवर्षी उत्तीर्ण होते. माझ्या आयुष्यात मी हौस-मौज करायची नाही का? सारखे स्वयंपाक कर, पदार्थ शिकून घे, नाहीतर सासरी भारी पडेल, असे आई सांगते. म्हणजे पुन्हा भविष्याची चिंता आहेच. मग माझे डोके दुखायला लागते. पुन्हा श्रुतिकाशी माझी सतत तुलना. “अगं, तुझ्या लहान बहिणीसमोर तू हाच आदर्श ठेवणार आहेस का?” आई म्हणते.
मग मी म्हणते, “आपले चांगले काय, वाईट काय हे जाणण्याएवढी श्रुतिका नक्कीच सुज्ञ आहे.’’ तसं पाहता कौमुदीचे पालक व ती आपापली बाजू योग्य प्रकारे मांडत होते; परंतु त्यातून हरवला जाणारा कौटुंबिक सुसंवाद दिसत होता. तो पूल सांधला जाणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही पालकांना व कौमुदीला समुपदेशनाच्या माध्यमातून समजावून सांगितले. त्यासाठी आम्हाला वर्तणूकविषयक उपचार व मानसोपचार यांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील लहान-मोठे ताण-तणाव कमी होऊ लागले. कौमुदीने झेपेल एवढे चित्रपट पाहण्यात गॅप देणे, आपल्या धाकट्या बहिणीसोबत व पालकांशी विश्वासार्ह नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे आम्ही कौमुदीच्या पालकांना देखील समजावले की, चर्चेसाठी त्यांनी घरातील वातावरण मोकळे ठेवणे आवश्यक होते. पौगंडावस्थेत मुला-मुलींना पालकांचा सकारात्मक आधार मिळणे जरुरीचे आहे. त्यांच्यावर न रागावता त्यांच्या चुका कौशल्याने दाखवून देणे हे पालकांनी केले पाहिजे.
घटस्फोटीत पालकांची मुले नेहमी असुरक्षिततेच्या वातावरणात दबलेली असतात. एक प्रकारचे सामाजिक दडपण मनात घेऊन ती वावरत असतात. अशा मुलांमध्ये वर्तन समस्या साहजिकपणे जास्त असू शकतात. अशावेळी या उमलत्या वयातील मुलांनी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत अथवा समुपदेशकाशी बोलून आपले मन मोकळे केले पाहिजे. मनात सतत कुढत राहिल्याने ही मुले नैराश्याची शिकार सहज होऊ शकतात. कारण मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांना आई-वडिलांचे प्रेम, सुरक्षितता व आधार मिळणे आवश्यक आहे.
अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविलेल्या निरीक्षणातून असे लक्षात आले आहे की, आपल्या आवडी-निवडींवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा यावयात मुले-मुली झुगारून देऊ शकतात. कुठल्याही क्षेत्रातील स्वतःची मते मुले-मुली धीटपणे मांडायला लागतात. पौगंडावस्थेतील नकारात्मक विचारांमुळे मुला-मुलींमध्ये उद्धटपणा, अस्थिरता, न्युनगंड, हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता असे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, त्यांना सकारात्मक रूप देण्यासाठी पालकांनी पाल्याच्या ऊर्जेला योग्य वळण देऊन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडविणे जरुरीचे आहे. त्यासाठी स्वतःच्या वर्तनाने उत्तम सामाजिक व नैतिक वागणुकीचा आदर्श मुला-मुलींना घालून देणे पालकांचे कर्तव्य ठरते. वयात येत असतानाचा मुला-मुलींच्या जीवनातील हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या सामाजिक विकासासाठी त्यांना सर्वांशी मिळून- मिसळून वागण्यास शिकविणे, संघ भावना वाढविणे हे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी प्रेरक ठरेल. या युगात मोबाइल, संगणक यांच्या मुक्त वापराने सायबर क्राईम्स हा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे याबाबत सतर्कता येणे जरुरीचे आहे.
भावेश या साध्यासुध्या मुलाची व त्याच्या कुटुंबीयांची माझी भेट मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात झाली. मित्रांच्या नादाने तो चरस व गांजा या व्यसनाच्या विळख्यात अडकला होता. त्यामुळे त्याचे पालक प्रचंड चिंतेत होते. समुपदेशकांच्या अथक प्रयत्नानंतर तो थोडा बोलू लागला होता. सकस आहार, मनःशक्तीसाठी प्रार्थना, नियमित योगाभ्यास या माध्यमातून त्याला व्यसनमुक्त करण्याचा समुपदेशकांचा प्रयत्न चालला होता. हळूहळू त्याच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर तो आपल्या पालकांसमवेत घरी गेला व नियमितपणे फॉलोअपसाठी येऊ लागला. पालकांनी सुद्धा आपली सहनशक्ती व मानसिक धैर्य राखून ठेवले आणि ते त्याच्या पाठीशी दीपस्तंभाप्रमाणे उभे राहिले.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणारा हा पौगंडावस्थेचा सुवर्णकाळ. ‘दिवस तुझे हे फुलायचे………, झोपाळ्यावाचून झुलायचे’ असा हा मुग्ध काळ सर्वांसाठीच आनंददायी ठरावा.