Wednesday, April 23, 2025

शील-अश्लील

  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर

तिचा चेहरा शांत व सालस आहे. तिनं कुंकू अथवा टिकली लावलेली आहे. ती विवाहित असल्यास तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि नसल्यास तिचा गळा उघडा राहणार नाही. याची तिनं काळजी घेतलेली आहे. लग्न झाले असल्यास हातात हिरव्या बांगड्या आणि नसल्यास इतर रंगांच्या बांगड्या आहेत. पारंपरिक वस्त्र साडी तिने अगदी व्यवस्थित कोणताही भाग उघडा दिसणार नाही, अशा पद्धतीने नेसली आहेत. ती स्त्री अर्थातच शील.

हिचा चेहऱ्यावर मात्र मादक भाव. हिच्या कपाळी कुंकवाचा पत्ता नाही. विवाहित असूनही गळ्यात मंगळसूत्र नाही. गळा पूर्ण उघडा राहील अशी हिची वस्त्रे. असे व यातील काही अथवा आणखी तथाकथित बिभत्स गोष्टींचे कॉम्बिनेशन असलेल्या स्त्रिया म्हणजे अश्लील.

गौतमी पाटील आणि ऊर्फी जावेद महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी रूपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या होत्या, राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्तिस्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणी काय घालवं, काय बोलावं आणि काय खावं, हे कोणी कोणाला सांगू शकत नाही. घटना तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल, तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ, वेळपरत्वे बदलत राहते. याबाबत कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

गौतमी आणि ऊर्फी यांना अश्लील ठरवणाऱ्यांनी हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. इतर लावणी नृत्यांगनांसह अनेकांनी गौतमीवर अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया स्टार छोटा पुढारी यानेही गौतमी पाटील हिला महाराष्ट्राचा बिहार केल्यास ‘मुसंडी’ मारू, असा इशारा दिला आहे. खरं तर मुसंडी या आगामी चित्रपटात त्याची भूमिका आहे. गौतमीच्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये हात धुवून तिच्या प्रसिद्धीत खारीचा वाटा उचलण्याचा छोटा पुढारी याचा प्रयत्न त्याच्या पुढारीपणाला साजेसा असाच आहे.

ज्याप्रमाणे छोटा पुढारी सोशल मीडिया स्टार आहे, त्याप्रमाणे ऊर्फी आणि गौतमी याही सोशल मीडियामुळेच प्रसिद्धीस पावलेल्या मोठ्या मुली आहेत. सोशल मीडियावरील तरुणाई नेमका कसा विचार करते? हे या दोघींनीही व्यवस्थित ओळखलेलं आहे. महाराष्ट्राला अश्लीलतेची मोठी परंपरा आहे आणि त्याचे द्योतक दादा कोंडके आहेत. ‘ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्यांच्या ओळीतील नॉनव्हेजपणा माहीत नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात दुर्लभ आहे. आचार्य अत्रे यांच्या पुस्तकांतील कमरेखालचे विनोद, बा. सी. मर्ढेकर यांची पुस्तके, अगदी महाराष्ट्रातील काही मासिके व काही मासिकांतून येणाऱ्या अश्लील कथा चवीने वाचणाऱ्यांची पिढी महाराष्ट्राने पाहिली आहे. महाराष्ट्राची मूळ लावणी त्यातील काही शब्द, ओळी यांची रचना याही तथाकथित अश्लीलतेकडे झुकणाऱ्याच आहेत. मग असे असताना गौतमीच सर्वांच्या रडारवर असं समजण्याची चूक करू नका.

त्या काळीही बा. सी. मर्ढेकर यांच्या कादंबऱ्यांना विरोध झाला होता. विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाईंडरला विरोध झाला होता अन् आज गौतमीलाही होत आहे. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षाला न्यूड बाईचे चित्र काढावे लागते. याबाबत न्यूड नावाचा संवेदनशील सिनेमाही येऊन गेला. हिंदू देव-देवतांची नग्न चित्र काढल्यामुळे एम. एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले. त्यावेळी एम. एफ. हुसेन यांना आपण त्यांच्या धर्मावरून दोष देण्यात आला. पण राजा रविवर्मा यांनाही याच गोष्टींचा सामना कमी-अधिक फरकाने करावा लागला, हे विसरून कसे चालेल.
गौतमीचा मुद्दा चर्चिला जाताना रूपाली चाकणकर यांचे आधी वापरले गेलेले, शील आणि अश्लीलतेची परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते, हे वाक्य लक्षात घ्यावेच लागेल. गौतमीला विरोध करणारा जसा मोठा वर्ग आहे, तसा तिला पाठिंबा देणाराही मोठा वर्ग आहे. यातील आजच्या पीढीची मंडळी गौतमीला सपोर्ट करतात कारण, त्यांना तिचं नृत्य हे नॉर्मल वाटतं. कारण, याहीपेक्षा अश्लील समजले जाणारे हॉलिवूडपट अन् बॉलिवूडपट ही पीढी पाहते. परदेशी, देशी कलाकारांची गाणी ऐकते. त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुली या महाविद्यालयात गौतमीपेक्षाही तोकडे कपडे घालून येतात अन् त्याचं त्यांना आश्चर्य वाटत नाही.

याचवेळी, गौतमीचा चाहता वर्ग जो ग्रामीण महाराष्ट्रात मुख्यत्वाने आहे, त्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे आणि यामागचं व्यावसायिक राजकारणही समजून घेतलं पाहिजे. सध्याच्या ग्लॅमर अन् सोशल मीडियाच्या दुनियेत अन् त्याचबरोबर सध्या भारतीय संस्कृतीवरून केले जाणारे राजकारण आणि त्याला काॅन्ट्रोव्हर्सीची असणारी भूक शमवण्यासाठी काय करावे लागणार, हे गौतमीने खरंतर अचूक हेरले आहे. तसेच एकेकाळी अडगळीत पडलेल्या लावणीला मिळालेली राजमान्यताही तिने हेरली आणि लावणीला बिहारी टच देत तिनं तिचा व्यवसाय सुरू केला जो सध्या तेजीत आहे.

याच्यावर अनेकांचा कितीही जळफळाट होत असला तरी गौतमीच्या नृत्यापेक्षाही काहींच्या मनातले चोरटे विचार अश्लील असतात, हे त्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या महिला अनुभवतातच. त्यामुळे शील-अश्लीलतेच्या कॉन्ट्रोव्हर्सीत हात धुवून घेण्यापेक्षा तुमच्या तुमच्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणेच इष्ट. महाराष्ट्राची परंपरा अश्लील होतीच आणि आताही आहे आणि पुढेही असेलच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -