Wednesday, January 15, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजैवविविधता दिवस

जैवविविधता दिवस

  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
जैवविविधतेच्या समस्यांबद्दलचे समज आणि जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचा दिवस घोषित केला आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे, हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेळी-अवेळी पडणारा पाऊस, पिकांचे होणारे नुकसान, छोटे-मोठे येणारे नवे आजार हे सारे प्रत्येकजण अनुभवतो. मानवाच्याच कृतीमुळे होणाऱ्या जैवविविधतेच्या ऱ्हासाचे हे परिणाम होत. अनादिकालापासून आपली पृथ्वी जैवविविधतेत समृद्ध होती. समृद्ध जैवविविधता (मेगा बायो डायव्हर्सिटी) बाळगणाऱ्या जगातील फक्त १२ देशांत भारत आहे.

भारतातील काही जैववैविध्य क्षेत्र – हिमालयातील हिमशिखरे, गंगेचे पठार, अरवली, सातपुडा, विध्यपर्वत रांग, राजस्थानातील वाळवंट, सुंदरबनचा दलदलयुक्त त्रिभुज प्रदेश, दक्षिण केरळमधील जलमार्ग, महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट (सह्याद्री), गवताळ प्रदेश, तिन्ही बाजूने असलेला समुद्र किनारा, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप ही बेटे …समृद्ध जैवविविधतेच्या क्षेत्राला हाॅट स्पॉट असे म्हणतात. जैवविविधतेच्या समस्यांबद्दलची समज आणि जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचा दिवस घोषित केला आहे.

जैवविविधता : जैव म्हणजे जीव; विविधता म्हणजे वेगळेपण. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. ही एक व्यापक संकल्पना आहे. सूक्ष्म जीवांपासून महाकाय क्लिष्ट वनस्पती प्राणी जैवविविधतेत मोडतात.

निसर्गातील सर्व सजीव स्वतःच्या अस्तित्वासाठी एका अन्नसाखळीत गुंफलेले असतात. त्यांचे स्वरूप हे अधिवासावर अवलंबून असते. त्यानुसार त्यांची शारीरिक जडणघडण असते. अधिवासातील सजीवांचे अस्तित्व दुसऱ्या सजीवाला जगण्यासाठी मदतच करीत असतात. अधिवास संरक्षित केल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊ शकते. आपण हवा, पाणी, अन्न, निवारा, नैसर्गिक सौंदर्य, यासाठी निसर्गातील सजीवांवरच अवलंबून आहोत. मृत्यूनंतरही मृत शरीराच्या विघटनामुळे शरीराचा भार पृथ्वीवर राहत नाही. याचाच अर्थ मानवाच्या अस्तित्वासाठी, कल्याणासाठी जैवविविधता महत्त्वाची आहे.

पृथ्वीच्या संतुलनासाठी प्रत्येक सजीव कळत-नकळत योग्य भूमिका बजावत असतो. मोठे सस्तन प्राणी वाघ, सिंह, हत्ती, पक्षी गिधाडे, समुद्रातील व्हेल, डॉल्फिन मासे, निसर्ग संतुलनासाठी पूरक भूमिका बजावतात. एक वाघ अनेक एकर जंगलाचे रक्षण करतो. यासाठीच पर्यावरणातील प्रत्येक सजीव महत्त्वाचा.

प्राण्याच्या अन्नसाखळीत भक्ष आणि भक्षक यातील एक जरी घटक नाहिसा झाला, तर उपासमारीची वेळ येते. पक्षी फळ, फुलंझाडावर उदरनिर्वाह करताना परागीभवन, बीजप्रसार होतो. झाडांच्या संवर्धनामुळे ऊन, वारा, पाऊस यांचे संतुलन राहते. जल, वायू, अन्न ही सारी चक्रे एकमेकांवर अवलंबून असतात. हेच जैवविविधतेचे महत्त्व. यातच एकमेकांची निकटता भागवताना पर्यावरणात बदल झाला, तर नैसर्गिक संतुलन बिघडते.

आज वाढत्या लोकसंख्येमुळे कधी न भागणाऱ्या गरजांपोटी सजीवांचे नैसर्गिक अधिवास, परिसंस्था, साधनसंपत्तींचे शोषण होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे, छंद आणि व्यापारासाठी होत असलेली शिकार, वृक्षतोड, यातून होणारी जमिनीची धूप जमिनीसाठी विहिरी बुजविणे, गोड्या पाण्याची कमतरता, जंगलच्या खंदकांमुळे, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे होणारे प्रदूषण, परिसरातील या होणाऱ्या बदलामुळे झपाट्याने सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. (उदा. डायनासोर, माॅरिशचा डोडोपक्षी), सोलापूरमधील माळढोक पक्षी आभावाने दिसतो. वृक्ष तोडीला पर्याय म्हणून एकाच प्रकारची झाडे लावल्याने परिसरांतील विविधता नष्ट होते. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक नुकसान.

एखादे उपकरण बिघडले, तर दुरुस्त करता येते; परंतु एखादी प्रजातीची मूळ जात नष्ट झाली, तर ती निर्माण करता येत नाही. परिणामी पुढील संशोधनास वाव राहत नाही. उत्क्रांती थांबते. मूळ प्रजाती जिवंत असल्यानेच अनेक कडधान्ये, फळांच्या नवनवीन जाती संशोधन करून पिकवता येतात. म्हणून वनस्पतीची मूळ प्रजाती जपणे मानवाच्या दृष्टीने आवश्यक आहे. निसर्गात अनेक रोगांची उपचारक्षमता असलेली औषधे आहेत, ती तपासणे बाकी आहे. मानवास ज्ञात होण्याआधीच जैवविविधतेच्या ऱ्हासाबरोबर ही गुपिते नष्ट होतील. उत्क्रांती ही हळूहळू होत जाणारी क्रिया आहे. माकडापासून मानव तसेच मानवपासून सुपरमॅनही उत्क्रांती होऊ शकते. जैवविविधता टिकवली, तरच उत्क्रांती चालू राहील.

मानवी आजारावर वापरली जाणारी काही औषधे सजीवांपासून मिळालेली असतात. प्रतिजैविकांचा शोध जीवाणूपासूनच लागला. आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींना अतिशय महत्त्व आलेले आहे. समुद्र वनस्पती व प्राण्यापासून शोधलेली विविध औषधे आज उपयोगात आहेत. रासायनिक कीटकनाशकाच्या ऐवजी सृष्टीतील वनस्पती प्राण्यांचा उपयोग कीटनाशासाठी करता येतो हे सिद्ध झाले आहे.

जैवविविधता पर्यावरणाचे आरोग्य आणि स्थिरता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी जैवविविधतेचे महत्त्व विशद केले आहे. वृक्षवल्ली…आज जागतिक पातळीवर तसेच आपल्या देशात जैवविविधता टिकविण्यासाठी, घसरण थांबविण्यासाठी, एस. पी. गोदरेज, शेतकी शास्त्रज्ञ स्वामिनाथन, अनिल अग्रवाल असे अनेकजण कार्यरत आहेत. वृक्षतोडीच्या विरोधासाठी राजस्थानमधील बीष्णोई समाजाचे कार्य वाचा. हिमालय गावातील सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन. जंगलाजवळ राहणाऱ्या आदिवासी जमातीतील पर्यावरणातील कार्यकर्ता, एस. सूर्यामणी यांनी पदवी घेतल्यानंतर, जंगल वाचविण्यासाठी ‘तोरंगा’ या स्वतःच्या केंद्रामार्फत कार्य चालू आहे.

आपण काय करू शकतो? जैवविविधतेबरोबरचे आपले नाते, लोकांच्या भूमिका, कृती समजून घ्या. मग जैवविविधतेचे कृतीतून संवर्धन करा. मुळात भारतीय समाजात संवर्धनाची परंपरा घट्ट रुजलेली आहे. आपण भारतीय सूर्य, पाणी, वृक्ष, प्राणी या निसर्गातील घटकांची पूजा करतो. देवाशी त्यांचे नाते जोडले आहे. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. राखून ठेवलेल्या देवराया. देवानेच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मनुष्य निर्माण केला.

भारतातील, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालय, वनस्पती उद्याने, यांना तसेच स्थानिक संवर्धन क्षेत्राला भेट देऊन अनुभव घ्या. जीवनात निसर्गाला केंद्रस्थानी माना. अनेक उपाय निसर्गातच आहेत. फक्त शोधा. निसर्ग, प्राणी, वनस्पती, इकोसिस्टीमवरील पुस्तके वाचा. बक्षिसे देताना जैवविविधता प्रतिबिंबित करणारी बक्षिसे विचारात घ्या. तुमच्या आवडत्या झाडाचा फोटो काढून त्या झाडांची जैवविविधता अधोरेखित करा.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या अग्रगण्य संस्थेच्या तसेच अनेक लहान-मोठ्या संस्था, निसर्गाचे/जैवविविधतेच्या संरक्षणाचे काम करतात. त्यांच्या उपक्रमांत सहभागी व्हा. स्वयंसेवक म्हणून काम करा. आपल्या मातीत रुजणारी झाडे लावा. शाश्वत जीवनशैली स्वीकारा. उद्याच्या भविष्यासाठी २०२३ च्या थीमनुसार कृतीतून जैवविविधतेचे संवर्धन करा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -