Tuesday, April 22, 2025

रम्य ते बालपण…

  • विशेष: माधवी जाधव, संरक्षण अधिकारी, चिपळूण
अगदीच बालपण हरवले नाही म्हणता येणार, पण ते बदलले आहे हेही खरे. त्याला कळत-नकळत आपणच जबाबदार आहोत, हेही मान्य करायला हवे. आपण जसे मुलांना वाढवणार तशीच त्यांच्यामध्ये घडण होणार.

हरवलेले बालपण यावर लिहाल का? असे एका मैत्रिणीने विचारले आणि त्या दिवसापासून विचारचक्र सुरू झाले. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आताच्या या जनरेशनची मुलं काय करताहेत? हे पाहताना खरंच अस्वस्थता निर्माण होतेय. माझी मुलगी दहा वर्षांची आणि भावाची चार वर्षांची अशी दोन मुलं घरी आहेत. पण त्यांचे बालपण आणि आमच्या दोघांच्या बालपणामध्ये कित्येक कोसो अंतर आहे, हे जाणवते आहे. सुट्टी सुरू झाली आणि मुलीने मला समर कॅम्प जॉइन करून दे, असे सांगितले. पंधरा दिवसांचा कॅम्प त्यामध्ये अनेक अॅक्टिव्हिटी होत आहेत, हे चांगलेच आहे. पण आम्ही कधी समर कॅम्प केला नव्हता, हेही तितकेच खरे. त्यानंतर घरी येऊन कार्टून पाहणे, मोबाइलवर गेम खेळणे आणि संध्याकाळी सायकल चालवणे, ड्रॉइंग करणे आणि डान्सचे व्हीडिओ करणे यापलीकडे काही नाही. महिनाभर सुट्टी आहे म्हणून जे चालले ते ठीक, असे म्हणून सारे सुरू आहे. यामध्ये डॉमिनोज, वॉटर पार्कला आणि सतत फिरायला जायचा हट्ट आहेच. असो.

एप्रिलला परीक्षा संपल्या की, रिझल्टची वाट पाहणे, १ मे ला रिझल्ट आला की, आजोळी किंवा पप्पांच्या गावी जाणे, सगळीच आम्ही भावंडं एकत्र यायचा हा क्षण. खरे तर आमचे खेळ फार वेगळे होते दिवस सुरू झाला की, आमचा भातुकलीचा खेळ सुरू व्हायचा. सगळी खेळणी मांडून काहीतरी स्वयंपाक करणे, चहा करणे, गेस्ट म्हणून एकमेकांकडे जाणे, अशी ही बाहुला बाहुली आणि भातुकली एक वेगळीच गंमत होती. त्यानंतर लपाछपी, पकडा-पकडी, डोंगर की पाणी, तळ्यात-मळ्यात, लगोरी, आईचे पत्र हरवलं असे कित्येक खेळ आम्ही घरी, घरच्या अंगणात खेळायचो. संध्याकाळ झाली की, गावामध्ये घरासमोर एक मंडप असतो लाकडी खांबावर आधारलेला. त्या खांबांना पकडून खांब खांब खेळणे हे तर आवडीचे. रात्री गाण्याच्या, कधी गावांच्या तर कधी नावांच्या भेंड्या आणि एखाद्या वेळेस भीतीदायक गोष्टी. जसजसे मोठे होऊ लागलो तसे खेळ तेच राहिले आणि त्याबरोबर रात्रीच्या गप्पा आणि खळाळून हसणे. कधी तरी डान्सची ही धमाल. कधीतरी संध्याकाळी आंब्या-काजूच्या बागेत फिरायला जाणे असे करत सुट्टी कधी संपायची, हे कळायचेही नाही.

अजून एक आठवण, मम्मी-पप्पांच्या दोघांच्याही आई-वडिलांनी केलेले प्रचंड प्रेम. पप्पांच्या वडिलांना मी ‘बाबा’ म्हणत असे. त्यांचा सहवास फार नाही लाभला. पण मी बारा वर्षांची असेन, तोपर्यंत ते माझ्यासोबत होते आणि कायम राहतील. मंत्रालयालमधे क्लर्क म्हणून व्हीआरस घेतली होती. उत्तम वक्तृत्व आणि त्यांनी सांगितलेल्या अकबर-बिरबलच्या गोष्टी, माझी प्रत्येक सुट्टी मी त्यांच्यासोबत घालवली आहे, आई-बाबांसोबत गावी राहणे हे खूप भारी होतं. मम्मीचे वडील अण्णा ते शिपवर असल्याने जेव्हा यायचे, तेव्हा 963.त्यांनी आणलेली चॉकलेट्स, बाहेगावाहून आणलेली खेळणी हे सारेच अनुभवताना त्या दोघांनाही माझ्या हुशारीचा अभिमान होता. त्यावेळी मी शाळेत पहिली, प्रद्या शोध, स्कॉलरशिप, मराठी, हिंदी परीक्षा तसेच वक्तृत्व स्पर्धा या सगळ्यात मी असायचे. या दोन्ही आजोबांचा सहवास त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. आम्ही दोघं भावंडं कॅरम, बुद्धिबळ, नवा व्यापार हे खेळलो, मस्ती केली, भांडलो. पण त्यामध्ये खूप गोष्टी सहज होत्या. तेव्हा मोबाइल नव्हते, टीव्हीवर ठरावीक कार्टून, शक्तिमान, महाभारत असेल, त्या वेळेत. पण आता या मुलांना मोबाइल गेम आणि व्हीडिओ गेम यामधून वेळ मिळेल तर ना. खेळण्याचे स्वरूप बदलले आहे. भातुकलीचा सेट इलेक्ट्रॉनिक्स आल्यामुळे सहजता आली. आऊटडोअर गेम म्हणजे मॉलमध्ये जाऊन तासनतास खेळणे. खरंच बालपण बदलले आहे.

अगदीच बालपण हरवले नाही म्हणता येणार, पण ते बदलले आहे हेही खरे. त्याला कळत नकळत आपणच जबाबदार आहोत, हेही मान्य करायला हवे. आपण जसे मुलांना वाढवणार, तसे त्यांच्यामध्ये घडण होणार. यालाच तर जनरेशन गॅप म्हणतात. बालपण आता त्यांच्यासाठी ते छान, सुखाचे आहे फक्त. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. रम्य ते बालपण म्हणत निरागस भाव जपत त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे खेळू द्यावे, बागडू द्यावे. बालपण मानवी जीवनातील अत्यंत सुखदायी, आनंदी क्षण. अशा वेळी पालक म्हणून मुलांना प्रेम आणि समजून घेणे, चांगली-वाईट समज त्यांना समजेल या भाषेत सांगणे आणि ते जपणे एवढेच करूया. काल, आज आणि उद्या आपल्यामध्ये जिवंत असते निरंतर बालपण. म्हणूनच ते समृद्ध होणेही तितकेच गरजेचे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -