मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट चलनातून माघारी घेतली. त्यानंतर सोन्याची खरेदी वाढू लागली आहे. ज्यांच्यांकडे दोन हजारांच्या जास्त नोटा आहेत, ते सोने खरेदी करू लागले आहेत. तसेच चांदीची खरेदीही करीत आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला व बँकेने या नोटा चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँक आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेकडून यापूर्वीच २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. पण त्या चलनात कायम होत्या. आता या नोटबंदीचा फायदा प्रामुख्याने गुजरातसह अन्य ठिकाणचे सराफी व्यापारी घेत आहेत.
‘आरबीआय’ने २०००ची नोट चलनातून बाहेर घेतल्याचा निर्णय जाहीर करताच गुजरातमधील ज्वेलर्सने दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सोने घेणाऱ्यांसाठी किंमत वाढवून दिली आहे. दोन हजारांच्या नोटा देऊन सोने घेणाऱ्यांना १० ग्रॅमसाठी ७० हजार रुपये द्यावे लागणार आहे. राज्यात शनिवारी सोन्याचा दर मात्र दहा ग्रॅमसाठी ६० हजार २७५ रुपये होता. तसेच चांदीचे दरसुद्धा ८० हजार रुपये किलो करण्यात आले आहेत.
ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या जास्त नोटा आहेत, ते बँकेत जमा करण्यासाठी गेल्यावर त्यांची वार्षिक कमाई विचारली जाईल. त्यानुसार त्यांना कर द्यावा लागणार आहे. जास्त कॅश ठेवल्यानंतर सरकार विचारणाही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी केली जात आहे.