-
काव्यकोडी: एकनाथ आव्हाड
चिन्हांची सोबत
वाक्य पूर्ण झाले
हसून सांगे पूर्णविराम
दोन छोट्या वाक्यांना
सहज जोडे अर्धविराम…
एका जातीच्या शब्दांमध्ये
येऊन बसे स्वल्पविराम
वाक्याच्या शेवटी बोले
तपशिलात अपूर्णविराम…
प्रश्न पडतो तेव्हा
धावून येई प्रश्नचिन्ह
भावनांच्या रसात बुडून
उभे राही उद्गारचिन्ह…
शब्दावर जोर पाडी
अवतरणचिन्ह एकेरी
कुणी बोले तिथेच दिसे
अवतरणचिन्ह दुहेरी…
कुठे घ्यावा विराम हे
चिन्ह सांगे अचूक
चिन्हांच्या सोबतीने
वाक्य लिहू बिनचूक…
चिन्ह वगळून वाक्य
कसे ओंगळवाणे दिसे
चिन्हांमुळेच वाक्याचा
अर्थ मनी ठसे…!
१) हा एक आहे
प्रमुख शिकारी पक्षी
निशाचर असून तो
फिरतो एकाकी
मोठे मोठे गोल
डोळे आहेत बरं
जो तो घाबरतो याला
याचं नाव सांगा खरं?
२) बदकासारखाच दिसतो
उत्तम प्रकारे पोहतो
पाण्याच्या काठावरच
राहणे पसंत करतो
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत
उल्लेख याचा केलाय
हुशार आणि जागरूक
या पक्ष्याचे नाव काय?
३) जोडीने हे फिरतात
मानवी भाषा बोलतात
कधी मंजूळ तर कधी
कर्कश आवाज काढतात
कबुतराच्या आकाराचे ते
मनुष्यवस्तीजवळ दिसतात
मैना किंवा शाळूदेखील
कोणत्या पक्ष्यांना म्हणतात?
उत्तर –
१)साळुंकी
२)चक्रवाक
३)घुबड
eknathavhad23 @gmail.com