Friday, July 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024दिल्लीला झुकवत चेन्नईची आगेकूच

दिल्लीला झुकवत चेन्नईची आगेकूच

ऋतुराज, कॉनवेच्या खेळीने केला सुपडा साफ

दिल्ली (वृत्तसंस्था) : ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्या झंझावाती सुरुवातीमुळे चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीसमोर २२४ धावांचे बलाढ्य लक्ष्य उभारले. त्यानंतर चहर, पाथिराना आणि तिक्षणा यांच्या दमदार गोलंदाजीसमोर दिल्लीने अवघ्या १४६ धावाच जमवल्या. चेन्नईने या सामन्यात दिल्लीवर ७७ धावांनी दणदणीत विजय मिळवत ‘प्ले ऑफ’मध्ये थेट प्रवेश केला.

चेन्नईने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने निर्धारित २० षटकांत केवळ १४६ धावाच जमवल्या. एकट्या डेव्हिड वॉर्नरने कॅपिटल्सकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने ८६ धावांची मोठी खेळी खेळली. त्यांचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. वॉर्नर वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावा जमवता आल्या नाहीत. दिल्लीचे ४ फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत. दीपक चहर, मथीशा पाथिराना आणि महिश तिक्षणा या तिकडीने दिल्लीचा सुपडा साफ केला. चेन्नईतर्फे दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. पाथिराना आणि तिक्षणाने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. या तिन्ही गोलंदाजांनी धावाही चांगल्याच रोखल्या. त्यामुळे दिल्लीला केवळ २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १४६ धावाच करता आल्या.

चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी धडाकेबाज सलामी दिली. या जोडीने १४१ धावांपर्यंत चेन्नईची विकेट पडू दिली नाही. कॉनवेने ८७, तर ऋतुराजने ७९ धावा फटकवल्या. चांगली सुरुवात मिळाल्यामुळे चेन्नई धावांचा डोंगर उभारणार हे जवळपास निश्चितच होते. शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी अपेक्षित अशी लिटल कॅमियो खेळी खेळत चेन्नईची धावगती कमी होऊ दिली नाही. दुबेने ९ चेंडूंत २२ धावा फटकवल्या, तर जडेजाने ७ चेंडूंत नाबाद २० धावा तडकवल्या. त्यामुळे चेन्नईने निर्धारित २० षटकांत ३ फलंदाजांच्या बदल्यात २२३ धावा जमवल्या. दिल्लीचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले. खलील अहमद, नॉर्टजे आणि सकारिया यांना प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -