-
कथा: रमेश तांबे
ती ओक्साबोक्सी रडू लागली. साऱ्या वर्गात सन्नाटा पसरला. वर्गाचा हसरा मूड पार बदलून गेला अन् त्याची जागा आश्चर्य आणि सहवेदनांनी भरून गेली.
सर म्हणाले, ‘मुलांनो अभ्यास बंद, आज थोडी मजा करू, वर्गात मस्त खेळ खेळू, छान छान गाणी म्हणू!’
‘हो सर, हो सर!’ मुले एका सुरात ओरडली. मग वर्गात एकच गडबड गोंधळ सुरू झाला. आत लपून बसलेला मुलांचा हूडपणा बाहेर आला. एकच धमाल सुरू झाली. वर्ग हाताबाहेर जातोय, हे बघून सरांनी टेबलावर डस्टर आपटले. तोच सारा वर्ग गुपचूप झाला.
सर म्हणाले, इथे प्रत्येकाने यायचे अन् आपली कला सादर करायची. गोष्ट सांगा, कविता म्हणा वा माहिती… विनोद सांगा. पण प्रत्येकाने इथे यायचेच! एक एक विद्यार्थी पुढे येऊ लागला. कुणी गाणं म्हटलं, तर कुणी कविता. कोण नुसताच उभा राहून टिवल्या-बावल्या करून गेला. वर्गातल्या सुर्वेने तर कमालच केली. त्याने असा काही भन्नाट नाच केला की, सारा वर्ग त्याच्यासोबत नाचू लागला. स्मिता अभ्यंकरने अवघड अवघड प्रश्न विचारले, तर अचपळ मोरेने विनोद करून मुलांना मनसोक्त हसवले. आतापर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने आपली कला सादर केली होती. अर्ध्या वर्गाचे सादरीकरण झाले होते. आता नंबर होता मयूरी सावेचा!
सरांनी मयूरी सावे असा पुकारा केला. पण एक नाही, दोन नाही. मयूरी जागेवरून उठलीच नाही. आता साऱ्या वर्गाने मयूरी… मयूरी असा तिच्या नावाचा धोशा लावून धरला. आता मात्र मयूरीला उठणे भागच होते. ती मान खाली घालून व्यासपीठावर आली. अन् तशीच मान खाली घालून उभी राहिली. वर्गात पुन्हा तिच्या नावाचा पुकारा मुलं करू लागली. पण तिची मान तशीच खाली… अन् नजर जमिनीवर एकटक! ‘घाबरली… घाबरली’ काही मुलं ओरडली. तेव्हा सर मयूरीजवळ गेले अन् म्हणाले, ‘मयूरी काय झालं बाळा!’
मयूरीने मान वर केली तेव्हा तिचे अश्रूंनी भरलेले डोळे सरांना दिसले. तिच्या डोक्यावर हात ठेवत सर म्हणाले, ‘बोल ना, काय झालं’ सरांनी असं विचारताच मयूरीच्या अश्रूंचा बांध फुटला. ती ओक्साबोक्सी रडू लागली. साऱ्या वर्गात सन्नाटा पसरला. वर्गाचा हसरा मूड पार बदलून गेला अन् त्याची जागा आश्चर्य आणि सहवेदनांनी भरून गेली.
मयूरी रडवेल्या सुरात बोलू लागली. सर आजच माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. आई-बाबा तिकडेच आहेत. मी एकटी घरात बसून काय करणार… म्हणून बाबांनी मला शाळेत पाठवले. पण आज वर्गात मजा सुरू आहे. अन् मी दुःखात! आता मयूरीने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला अन् ती मुसमुसून रडू लागली. तसे सर म्हणाले, ‘बाळ रडू नकोस, जा आपल्या जागेवर जाऊन बस!’
मयूरी आपल्या जागेवर जाऊन बसली. पण साऱ्या वर्गाचा मजा करण्याचा मूड पार गेला होता. त्यामुळे पुढच्या नावाचा पुकारा झालाच नाही. वर्गात एक गूढ शांतता पसरली होती. सर खूर्चीत बसून पुस्तक वाचू लागले. मुलेही अगदी शांत बसली होती. तोच मयूरी पुन्हा व्यासपीठावर आली अन् वर्गाकडे बघून म्हणाली, ‘काय मित्रांनो, कसा वाटला माझा अभिनय!’ असं म्हणताच, सरांसह सारीच मुलं चकीत झाली. अनेकांनी तर तोंडातच बोटं घातली. हळूहळू वर्गात हशा उमटला. जोरदार टाळ्या वाजू लागल्या.
सर म्हणाले, ‘काय गं मयूरी, अगदी रडवलंस बघ! मला अन् साऱ्या वर्गालाही. अजूनही विश्वास बसत नाही की, मघाचे तुझे रडणे खरे मानायचे की आताचे तुझे बोलणे!’ मयूरीने सरांना वाकून नमस्कार केला अन् ती तिच्या जागेच्या दिशेने जाऊ लागली, तेव्हा सरांना आता तिच्यात एक कसलेली अभिनेत्री दिसू लागली.