मुंबई : मुंबईत तिसऱ्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या जी-२० बैठकीत ठरवण्यात आलेल्या जुहू बीचवरील ‘मेगा बीच-क्लीन अप इव्हेंट’मध्ये आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. समुद्र किनारा स्वच्छतेच्या या उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. या इव्हेंटमध्ये जी-२० च्या सर्व २० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या महत्त्वपू्र्ण सहभागाबद्दल नागरिकांना संवेदनशील करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. “पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. दररोज एक मिनीट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरणाचा -हास होणार नाही व समतोल राखला जाईल. तसंच आपण आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज असे दुष्परिणाम अनुभवतोय त्यातून थोडासा दिलासा मिळेल”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
बीच क्लीन-अप मध्ये सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिनिधींचे आभार मानले आणि या परिषदेने आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी आपल्या सर्वांना एकत्र आणले आहे, असं ते म्हणाले. पुढे अभिमानाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आठवून आपली पृथ्वी मानवी जीवनासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपण दररोज करत असलेलं प्रत्येक काम हे पर्यावरणपूरक असल्याची खात्री आपण स्वतःला दिली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह सहभागी होत जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली.… pic.twitter.com/ljD93KnuMY
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 21, 2023
मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनवरही प्रकाशझोत टाकला आणि या मिशनमुळे देशभरातील बहुतेक गावे आणि शहरे स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत, असं ते म्हणाले. त्यानंतर राज्य सरकारने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही कार्यक्रम आधीच सुरू केले असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
VIDEO | Maharashtra CM Eknath Shinde participates in G20 Mega Beach Clean Up event at Juhu Beach, Mumbai. pic.twitter.com/aBkf76QHdH
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2023