Tuesday, May 6, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

‘यदा कदाचित...’ न भूतो न भविष्यती

‘यदा कदाचित...’ न भूतो न भविष्यती
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणतात. तसेच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवारला त्यांच्या सरांनी शाळेत असतानाच ‘हा पुढे अभिनयाच्या क्षेत्रातच जाणार’ असे ठामपणे सांगितले होते. गिरगावातील युनियन हायस्कूलमधून संतोषने शालेय शिक्षण पूर्ण केले. या शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी पुढे नावारूपाला आले. उदा. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ, जयवंत वाडकर इत्यादी. शाळेच्या स्नेहसंमेलनात संतोष नेहमी सहभागी व्हायचा व आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायचा.

संतोषच्या आयुष्यात पुढे टर्निंग पॉइंट आला. ज्यावेळी त्याने कॉलेजला प्रवेश घेतला. त्यावेळी आय.एन.टी. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होत होत्या. त्या स्पर्धेसाठी त्याने ‘अटेंशन’ नावाच्या एकांकिकेचे लिखाण केले. प्रशासनामध्ये पोलिसांची झालेली कुचंबणा हा या एकांकिकेचा विषय प्रेक्षकांना खूप आवडला. या एकांकिकेसाठी त्याला लिखाणाचे विशेष पारितोषिक मिळाले. त्यामुळे संतोषचा आत्मविश्वास वाढला. पुढे एम. डी. कॉलेजला असताना त्याने ‘असा मी अशी मी’ ही एकांकिका लिहिली. त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आय.एन.टी.ने या एकांकिकेचे रूपांतर नाटकात करण्यास संतोषला सांगितले. त्याचे नाटकात रूपांतर झाले. १०० ते १५० प्रयोग या नाटकाचे झाले.

त्यानंतरचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे संतोषने ‘यदा कदाचित कर्मस्य’ ही एकांकिका लिहिली. दत्ता घोसाळकर यांना ही एकांकिका खूप आवडली. त्यांनी त्याचे नाटकात रूपांतर करण्यास संतोषला सांगितले. संतोषने त्या एकांकिकेचे रूपांतर नाटकात केले. त्याला न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त झाले. त्याचे साडेचार हजार प्रयोग झाले. पुढे त्या नाटकातील काही पात्रांबद्दल आक्षेप घेण्यात आला. ते नाटक वादग्रस्त ठरले.

त्यानंतर ‘यदा कदाचित भाग २’ हे नाटक संतोषने केले. त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘यंदा कदाचित’ हे नाटक त्याने केले. त्यात सोळा मुली होत्या. त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

त्यानंतरचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे त्याने पाच वर्षांपूर्वी ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. त्याचे १७४ प्रयोग झाले होते. पुढे या नाटकाच्या निर्मात्याचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ यामुळे हे नाटक बंद पडले. संतोषचा कॉलेजचा मित्र किरण केळकर याला नाट्य क्षेत्रात काही तरी करायचं होतं. त्याच्या पत्नी मानसी केळकर यांनी संतोषला नवीन नाटक मला निर्माण करायचं आहे, असं सांगितलं. संतोषने त्यांना सांगितलं, आपण ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हेच नाटक करू, कारण त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. जेव्हा निर्मात्यांनी या नाटकाला होकार दिला, तेव्हा संतोषने ते नाटक परत लिहिलं, त्यात बदल केले. कौरव, पांडव, श्रीकृष्ण हे नाटकातील पात्र बदललं गेलं, नवीन पात्राची निर्मिती केली गेली.

नव्या दमाचे तेरा कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. स्वतः संतोष पवारदेखील यामध्ये आठ विविध भूमिका साकारत आहे. सोहम प्रोडक्शन निर्मित व भूमिका थिएटर प्रकाशित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन संतोष पवारने केले आहे. या नाटकाचे संगीत प्रणय दरेकर, तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे.

Comments
Add Comment