नोटबंदीवर राज ठाकरेंनी सुनावले
नाशिक : नोटबंदी कशासाठी? २०१६ मध्ये अचानक नोटाबंदी करुन २०००च्या नोटा आणल्या. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे जमा करायचे. पुन्हा नव्या नोटा निघतील. हे असे सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, देशाला असले निर्णय परवडणारे नसतात, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. आता त्या नोटा पुन्हा बंद केल्या. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी नोटाबंदी झाली होती, तेव्हा एक भाषण केले होते. हा धरसोड करण्याचा एक प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. नाशिक दौऱ्यावर असताना ते शनिवारी (२० मे) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी नवीन नोटा बाजारात आणण्याआधी त्या मशीनमध्ये गेल्या की नाही हे तपासले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. सुरवातीला नोटाबंदी झाली त्यावेळी नवीन नोटा आणल्या, तर त्या २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये जात नव्हत्या. म्हणजेच नोटा आणताना त्या मशिनमध्ये जातात की नाही हेही पाहिले गेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना ३० सप्टेंबरपर्यंत, या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत २०००च्या नोटा चलनात राहतील आणि व्यवहारही करता येतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दंगली हव्या आहेत का?
त्र्यंबकेश्वरमध्ये १३ मे रोजी धूप दाखवण्याच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांना अन्य धर्मीय लोकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्वरला धूप-अगरबत्ती न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावर जे काही घडले, त्यावरून चांगलेच वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्र्यंबकेश्वरच्या मुद्दात बाहेरच्यांनी पडू नये. मंदिराबाबतचा निर्णय तिथल्या ग्रामस्थांनीच सोडवावा, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे, त्यामुळे ती बंद करण्यात अर्थ नाही. हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का की अन्य धर्मातील व्यक्ती आपल्या मंदिरात आल्यास हिंदू धर्म भ्रष्ट होईल? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की, अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं हिंदू-मुस्लिम एकत्रित राहतात. तिथे दंगली होत नाहीत. कारण, ते अनेक पिढ्या इथं राहिलेली असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरात जे काही झाले ते चुकीचे आहे. यातून कोणाला दंगल घडवायची आहे का? जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे प्रहार करणं गरजेचं आहे, मी भोंग्याचा विषय काढला. दर्ग्यावर बोललो होतो. गड किल्यावर जे दर्गे आहेत, ते हटवले पाहिजेत. ठाण्यामधीलही नुकतीच एक अनधिकृत मज्जीद मी हटवली, पण, मुद्दाम काहीतरी खोदून काढायचं याला अर्थ नाही, असं ते म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक भागात दंगली उसळल्या आहेत. या दंगलीनंतर भाजपच्याच लोकांनी हिंदू खतरें मे है, असं म्हणत आंदोलनं केली. याविषयी बोलतांना राज ठाकरे यांनी बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात ‘हिंदू खतरे मे’ कसा काय असू शकतो, असा सवाल केला.