मुरूड : अलिबाग, रोहा व मुरुड तालुक्याला जोडणारा दुवा असलेल्या साळाव पूलाचे मागील काही महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होऊन एसटी सेवा सुरू न झाल्यास याविरोधात प्रवासी व परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून साळाव पुलावरुन बिनदिक्कतपणे होणारी अवजड वाहतुक व पूलाला बार्जने दिलेल्या धडकीमुळे पूलाची पार दुरावस्था झाली. याबाबतचे वृत्त देखील वृत्तपत्रात देण्यात आले होते तसेच याठिकाणी पर्यायी पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती.
मागील काही महिन्यांपासून साळाव पूलाचे दुरुस्तीचे काम केले जात आहे. यामुळे पुलावरुन एसटी सेवा बंद करण्यात आल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. याचा मुरुड, जंजिरा, रेवदंडा, नागांव येथील पर्यटनावर परिणाम झाला आहे.
बाजारहाट करण्यासाठी प्रवासी नागरिकांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुलावरुन पायपीट करावी लागत आहे. पूलावर टाकण्यात आलेले गतिरोधक व खड्ड्यात वाहने अक्षरशः आपटत असल्याने याचा प्रवासी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीत साळाव पूलाचे दुरुस्तीचे काम विशेष बाब म्हणून तातडीने पूर्ण करण्यात येऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात पुलावरुन एसटी सेवा सुरू करण्यात यावी. अन्यथा याविरोधात परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशारा प्रफुल्ल मोरे यांनी दिला आहे.