सावनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. या दरम्यान फडणवीस यांनी काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलेल्या एका नेत्याच्या घरी भेट दिली. त्यामुळे या नेत्याला आता भाजपमधून उमेदवारी मिळणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सोबतच या नेत्याच्या हालचालींमुळे तो भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
‘आशिष देशमुख’ असं या नेत्याचं नाव असून त्यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
दरम्यान सावनेरमध्ये शुक्रवारी १९ मे ला कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं. उमेदवार ठरल्यावर वाद नको, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देशमुखांना सावनेरमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल.
सोबतच देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आशिष यांनी आपले वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मे ला सावनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. रणजीत हेच आधी सावनेरचे आमदार होते. सावनेरचे सद्यकालीन आमदार सुनील केदार यांनी १९९६ मध्ये त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता आशिष देशमुख पुन्हा या जागेवर डोळा ठेवून असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल.