मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २०१९ साली जिंकलेल्या १९ जागांवर आम्ही लढणार आणि विजयी होणार, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राऊतांना झापल्याचे दिसून आले.
आज नांदेडच्या दौऱ्यावर असलेले राऊत यांनी महाराष्ट्रातल्या १९ तसेच दिव-दमण येथील अशा लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला. या सर्व जागा शिवसेना म्हणून जिंकल्या होत्या. त्यामुळे तेथे असलेले खासदार आता कोणाकडे आहेत? हा प्रश्नच येत नाही आणि या सर्व जागा आम्ही लढणार, असे ते म्हणाले. त्यावर लगेचच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, महाविकास आघाडीमधले जागावाटप अजूनही ठरलेले नाही. अशा वेळी महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होईल, अशी वक्तव्ये कोणी करू नयेत, असे बजावले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही संजय राऊत यांचा दावा खोडून काढताना लोकसभेच्या जागावाटपाबाबत मविआमधल्या तीनही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे सांगितले.
आघाडीने ठाकरे गटाला दिल्या आहेत फक्त पाच जागा : नितेश राणे
संजय राऊत यांच्या या दाव्यावर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनीही भाष्य केले. सिल्व्हर ओक, या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने ठाकरे गटाला फक्त पाच जागांची ऑफर दिली होती. ही ऑफर जर मान्य नसेल, तर तुम्ही आघाडीसोबत निवडणूक लढवू नका, असे त्यांना स्पष्टपणे बजावले गेले, अशी आमची माहिती आहे. ही माहिती खरी आहे की खोटी, हे उद्धव ठाकरे किंवा संजय राजाराम राऊत यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी दिले.