- मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर
‘गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मीलन’
खरंच गंधात किती ताकद असते नाही. न दिसताही स्पर्शून जातो, मनात साठून राहतो.
आठवणीत दाटून येतो, हृदयात भरून राहतो. खरंच ताकद असते गंधात!
‘स्पर्श जर व्यक्त होत असेल, तर गंध अनुभूती देत असतो.’ कितीतरी वास असतात आसपास. त्या प्रत्येक वासात काही ना काही दडलेलं असतं. प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, सृष्टीतल्या प्रत्येक सजीव-निर्जीव, चेतन-अचेतन गोष्टीत गंध सामावलाय. आईने बनवलेल्या सुग्रास स्वयंपाकात, बाबांच्या हातरुमालाच्या अत्तरात, दादाच्या बॅगेत ठेवलेल्या लिमलेटच्या गोळीत, ताईचा माळलेल्या मोगऱ्याचा गजऱ्यात. नवजात बालकाच्या दुपट्यात. त्याला न्हाऊ घातल्यानंतर त्याच्या अंगाला येणारा पावडरचा मोहक वास, शेक दिल्यानंतर धुरीचा वास कितीतरी काळ आईच्या शरीरात साठून राहतो.
पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच येणारा मातीचा मस्त सुगंध. तोच तसाच कायम, पण तरीही दर वर्षीच्या पावसाची वाट पाहताना प्रथम आठवतो तो मातीचा गंध. त्याने तर सुरुवात होते ना पुढे येणाऱ्या अनेक थेंबांची… मग बरसात होते गंधाची. मग त्या गंधात न्हाऊन निघतो आपण. फक्त पाऊस साक्षीदार असतो गंधाचा असे नाही. प्रत्येक ऋतूतले गंध निराळे. हिवाळ्यात शेकोटीचा उबदार गंध, उन्हाळ्यात गारेगार वाऱ्याचा गोड वास. आंब्यांचा पिकलेला वास, असे कितीतरी गंध आपल्याला लहानपणापासून भेटत राहतात. मला सर्वात आवडणारा गंध म्हणजे नवीन पुस्तकांचा लहानपणी ही घाई असायची पुस्तकं घेण्याची.
बाबांच्या मागे मी नेहमी हट्ट करायचे, की आधी मला पुस्तक घ्या. मग काय, मी आणि बाबा एकत्र दुकानात जायचो. बाबा लिस्ट द्यायचे, मग दुकानदार त्याच्या कपाटातून शोधून नवीन पुस्तक द्यायचा; मी लगेचच पुस्तकांवर स्वतःचा हक्क गाजवत हाती घ्यायचे. पुस्तक उघडून त्याचा वास घ्यायचे. आजही मुलांची नवीन पुस्तक घेताना तोच वास अनुभवताना पुन्हा बालपणात गेल्यासारखं वाटतं. लहानपणी पुस्तकांना कव्हर घालायचे ना त्या पेपरचाही वास निराळा अजूनही स्मरणात आहे. गंध सहसा विसरता येत नाहीत. प्रियकराने दिलेल्या फुलात, प्रेयसीने दिलेल्या परफ्यूममध्ये, मैत्रिणीने माळलेल्या गुलाबात. देवाला अर्पण केलेल्या हार-फुलात. फुलांचा सुगंध आजूबाजूच्या वातावरणाला मोहून टाकतो. असे कितीतरी मोहक क्षण येतात. आयुष्यात आपल्याला गंध देऊन जातात. अगरबत्तीचा सुवास देवाला खूश करतो की आपल्याला? खरं तर आपणच धूप, अगरबत्तीचा आनंद घेत असतो. सगळ्यात विजयी ठरणारा सुगंध म्हणजे घामाचा सुगंध. अथक परिश्रमानंतर मिळालेला मोबदला हा फार मोलाचा ठरतो. घामाचा गंध तर खूप काही मिळवून देतो.
कित्येकदा माणसाला स्वतःला ठाऊक नसतं की, त्यात कोणता गंध लपलाय. कस्तुरी मृग धावत सुटते की, इतका छान सुगंध कुठून येतोय. चहूकडे पाहते, शोधत राहते, वेड्यासारखी पळत सुटते. पण वेडीला काय ठाऊक! कस्तुरीच्या कुपितच दडलेला असतो तो सुंदर सुवास. असंच असतं ना आपलं. आपल्याकडे किती छान आहे ते सोडून आपण सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी ती आपल्याला स्वतःतच सापडते. चला तर मग असा गंध आपण स्वत:तच शोधूया आणि सुगंधित होऊया.