शरद पवार यांच्यासह ९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती; ममता आणि उद्धव ठाकरे अनुपस्थित
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
सात वेळा राहिलेले खासदार केएच मुनियप्पा, डॉ. परमेश्वरा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचा पुत्र), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह या शपथविधी सोहळ्याला नऊ विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. यामध्ये शरद पवार (राष्ट्रवादी), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (जेडीयू) आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (एआरजेडी), डी राजा आणि सीताराम येचुरी (डावे), एमके स्टॅलिन (डीएमके), फारूख अब्दुल्ला (राष्ट्रीय काँग्रेस), कमल हसन यांचा समावेश आहे.
जातनिहाय, प्रदेशनिहाय आणि ज्येष्ठतेच्या आधारे पहिल्या टप्प्यात ८ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित होते. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शपथविधीला उपस्थित नव्हत्या.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला ६६, जेडी एस १९ आणि इतरांना चार जागा मिळाल्या आहेत.