Tuesday, May 13, 2025

महामुंबई

इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा मार्ग मोकळा

इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने २ हजार १०० एकमजली इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाचा निर्णय योग्य ठरवल्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या २ हजार १०० इलेक्ट्रिक बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसची संख्या वेगाने वाढून प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.



गेल्या वर्षी बेस्टने १ हजार ४०० अधिक ७०० एकमजली इलेक्ट्रिक बसची निविदा काढलेली होती. निविदा उघडल्यानंतर ही निविदा ओलेक्ट्रा या कंपनीस मिळाली होती. मात्र यावर दुसरा निविदाकार टाटा मोटर्सने उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत निर्णय देताना उच्च न्यायालयाची परत निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेससाठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार २ हजार १०० एकमजली बसचा करार योग्य ठरवला आहे. त्यामुळे २ हजार १०० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा बेस्टचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच बेस्टच्या ताफ्यात या बसेस दाखल होतील.



जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावलीनुसार १५ वर्षांनंतर सेवेतून बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात सध्या मोठ्या प्रमाणात बसेसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधीसुध्दा वाढला आहे. नवीन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. शिवाय या बसेस पर्यावरणपूरक तसेच आवाजरहित आणि वातानूकुलीत असून या बस भाडेतत्त्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही. त्यामुळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरिल चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होईल, असे बेस्ट महाव्यस्थापक लोकेश चंद्रा
यांनी सांगितले.


लवकरच येणाऱ्या बस




  • ओलेक्ट्रा व इबे २ हजार १०० एकमजली वातानुकूलित बस

  • स्विच मोबिलिटी २०० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस

  • चलो ४०० प्रीमियम बस

  • निविदा प्रक्रिया सुरू
    ७०० दुमजली इलेक्ट्रिक वातानुकूलित बस

  • निविदा प्रक्रिया सुरू
    १५० मिडी डिझेल बस

Comments
Add Comment