Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसुट्टीत शिका नवीन गोष्टी

सुट्टीत शिका नवीन गोष्टी

  • रवींद्र तांबे

बरीच मुले सुट्टीत हौस, मजा आणि मस्ती करीत सुट्टीची मजा लुटत असतात. आता मात्र ते दिवस राहिले नाहीत. तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात कोणतीही सुट्टी असो तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास त्यांना आपल्या जीवनातील दिशा ठरविता येईल. तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवीन काही गोष्टी शिकता येईल का, याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करून नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल अजून लागायचे असले तरी शालेय स्तरावरील मुलांचे निकाल लागले आहेत. तेव्हा प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीचा आस्वाद घेताना आपल्या आवडीच्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे. पूर्वी परीक्षा संपली की, मामाच्या गावी दुसऱ्या दिवशी जात असत. आता फक्त मामाचे गाव नावाला शिल्लक राहिले आहे. जरी मामाच्या गावी गेलो तरी मामाच्या घराचा दरवाजा बंद असून भले-मोठे कुलूप लावलेले दिसते. गावात उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागते. सणासुदीच्या दिवशी आपल्याला घर उघडे दिसते. मग जाऊन तरी काय फायदा. तेव्हा इतर ठिकाणी जाणे लोक पसंत करतात.

आता पूर्वीसारखे दिवस राहिले नसले तरी आपल्याला जेव्हा सुट्टी असेल, त्यावेळी नवीन काहीतरी शिकले पाहिजे. तेव्हा अशा मोठ्या उन्हाळी सुट्टीत काही तरी नवीन शिकता येईल का? त्या दृष्टीने मुलांनी स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत. महत्त्वाची बाब म्हणजे, आता हीच वेळ आहे, काही तरी नवीन शिकण्याची. एकदा वेळ निघून गेल्यावर पुन्हा वेळ येत नाही. असे असली तरी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी दररोज इंग्रजी आणि गणित विषयांकडे दुर्लक्ष करू नये. इंग्रजीमुळे मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. असे असले तरी आपली मातृभाषा मराठी आहे, हे विसरता कामा नये; परंतु तिचा पाया भक्कम नसल्यामुळे आपण इंग्रजी आणि गणित विषयांकडे दुर्लक्ष करतो.

त्यामुळे पुढील शिक्षण घेताना अडथळा निर्माण होतो. ग्रामीण भागात सातवीपर्यंत शाळा त्यात पटसंख्या कमी असल्यामुळे दोन शिक्षक. मग सांगा दोन शिक्षक, सात वर्ग, सहा ते दहा विषय आता सांगा कसे शिकविणार इतके विषय सात वर्गांना. इतर शासकीय कामे त्यात शिक्षक सेवक, पोटापुरता पगार नाही, मग सांगा अध्यापन होणार कसे? त्यामुळे तो इतर अवांतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. याची कल्पना पालक व शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा असते; परंतु आपण काय बोलणार म्हणून न बोललेले बरे.

अशा परिस्थितीमुळे नवीन गोष्टी काय शिकता येईल, यासाठी मुले व मुलांच्या आई-वडिलांनी एकत्र बसून चर्चा करावी. कारण, नवीन गोष्टी म्हणायला आल्या तरी त्यासाठी पैसा लागतो. याचा ही विचार होणे गरजेचे आहे. परीक्षा संपली म्हणजे आपण मुक्त झालो अशातला भाग नाही, तर त्यानंतर नवीन काय शिकता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. शाळकरी मुलांनी प्रथम आपल्या आवडी-निवडीकडे लक्ष द्यावे. यामध्ये आपल्या आवडीचा छंद कोणता आहे. त्याप्रमाणे शिकता येईल का? असे असले तरी छंद शिकायला काहीच हरकत नाही. मात्र पैसा वाया जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

नवीन कौशल्य आत्मसात करावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याप्रमाणे शिकले पाहिजे. वाद्य वाजवणे, नृत्य करणे, शिवणकाम, मातीची भांडी बनविणे, लाकडी खेळणी तयार करणे, बांबूपासून आयदाने तयार करणे, अशा अनेक गोष्टी शिकता येतील. मात्र त्याकडे एक मजा म्हणून न पाहता त्यातून व्यवसायनिर्मिती कशी करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. केवळ वेळ वाया घालविण्यासाठी असे काम करू नये. त्यातून काही तरी शिकता येईल, हे भान ठेवावे. जेणेकरून त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल, हे ध्येय असायला हवे.

जर अशा क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर अशी पदवी आहे का? कोणत्या ठिकाणी शिक्षण घेता येईल, त्याची चाचपणी करावी. तसेच त्या विषयाचा मार्गदर्शक कोण असेल, त्याला भेटून अचूक ज्ञान घ्यावे. आजही आपल्याला योग्य प्रकारचे मार्गदर्शन न मिळाल्याने आपली आवड असूनसुद्धा त्या विषयात करिअर करू शकत नाही. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या असतील, तर भविष्याचा विचार करून कोणती परीक्षा उत्तम प्रकारे देऊन उत्तीर्ण होऊ शकतो, यासाठी स्वत: विचार करून स्वत:च निर्णय घ्यायचा असतो.

आता आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्या आयुष्याला अधिक गती देण्यासाठी वाचन करा म्हणजे चांगले मित्र भेटतील. त्यात आपल्या करिअरलाही नवी दिशा मिळेल. तेव्हा सुट्टीत आपल्या करिअरचा विचार करून आपले पुढील भवितव्य घडवावे. शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, हे विसरता कामा नये. तेव्हा उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीत मुलांनी नवीन गोष्टी शिकायला हव्यात, त्यासुद्धा मुलांनी आपली दूरदृष्टी ठेवून.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -