उत्तरपत्रिका हस्ताक्षर घोटाळ्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात
हिंगोली : बारावीची पेपर तपासणी सुरु असताना यातील एक दोन नव्हे तर चक्क ३७२ विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे उघडकीस आले आहे. या अनोख्या कॉपीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडले आहे. प्रथमदर्शनी अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिली असल्याचे समोर आले आहे. पण हे हस्ताक्षर नेमके कोणाचे? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
एकाच उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे लक्षात आल्याने व हा प्रकार संशयास्पद असल्याने परिक्षकांनी याची माहिती शिक्षण मंडळाला दिली. त्यानंतर शिक्षण मंडळाने यासाठी एक चौकशी समिती गठित केली. या समितीने सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले. तसेच विद्यार्थ्यांसोबतच केंद्रप्रमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली. यानंतर या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालामुळे एकच खळबळ उडालेली आहे.
विशेष म्हणजे बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांमधील या उत्तर पत्रिका असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी हे हस्ताक्षर आपले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकार कसा घडला? ती व्यक्ती कोण? उत्तरपत्रिका जमा कधी केल्या? त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या? अशा अनेक प्रश्नांसह पर्यवेक्षक, कस्टडियन, मॉडरेटर, केंद्रप्रमूख हे सर्व जण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. याशिवाय सेंटर मॅनेज झाले होते का? उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या का? हा प्रकार बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत कसा घडला? असेही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.