लखनऊ (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करावे असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या वैज्ञानिक सर्वेक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगचे आदेश दिले होते. त्यानंतर ज्ञानवापी मशीद कमिटीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सुनावणीदरम्यान मशीद समितीचे प्रतिनिधित्व करणारे वकील हुजैफा अहमदी म्हणाले की, या प्रकरणात दिवाणी खटल्याशी संबंधित नियमांचे पालन केले जात नाही. त्याचवेळी हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, एएसआयने आम्हाला अहवाल दिला आहे की, या जागेत अतिक्रमण होणार नाही. यावर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की, एएसआयकडूनही अहवाल घेऊ शकतो. सरकारने कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल याचाही विचार करू द्या. आम्ही यावर नंतर सुनावणी घेऊ. सर्व पक्षांनी ती मान्य केल्यामुळे आम्ही नोटीस जारी करत आहोत, असे ते म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करण्याची गरज आहे. याची अंमलबजावणी होऊ नये असेही ते म्हणाले.