मुंबई : आजारपणात औषधोपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी आता केवळ मिस्ड कॉल द्या, मोबाईलवर आलेली लिंक ओपन करुन अर्ज भरा आणि मदत मिळवा, अशी सहज सोपी प्रक्रिया शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध केली आहे.
दुर्धर आजारपणात औषधोपचारांबरोबरच सर्वात जास्त गरज असते ती पैशांची. पैशांच्या अभावीच अनेकदा उपचार घेता येत नाहीत. रुग्णांची ही गरज ओळखून मुख्यमंत्री सहायता निधी सुरू करण्यात आला आहे. आता सरकारने या योजनेची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांनी 8650567567 या मोबाइलवर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाइलवरच अर्जाची लिंक मिळेल. त्याद्वारे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचा आहे. म्हणजे, आता रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ कमी होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना दुर्धर आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. त्यासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. ही मदत मिळवायची असेल तर सर्वात आधी अर्ज कुठे मिळणार इथपासून सुरूवात होते. रुग्णालयातून मदत मिळाली तर ठीकच अन्यथा रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी परवड होते. अशा वेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने या योजनेत आणखी सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने नवा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार नागरिकांसाठी मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमसएसद्वारे संबंधितांच्या मोबाइलवर मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात cmrf.maharashtra.gov.in या मेलवर पाठविता येईल.
या योजनेत कॅन्सरच्या आजारांवर मदत मिळण्यासाठी सर्वाधिक अर्ज येतात. या व्यतिरिक्त हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनीविकार यांसारख्या आजारांवर मदत मिळण्यासाठी अर्ज केले जातात. या आजारांसाठी सहायता निधीतून मदत केली जाते.
मदत मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिंदे सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेमुळे रुग्णांना अडचणीच्या काळात मदत मिळते.