Saturday, May 10, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

अजब कलाकृती ‘गजब तिची अदा’

अजब कलाकृती ‘गजब तिची अदा’

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील


दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर वामन केंद्रे यांनी अनेक व्यवसायिक नाटकांचे दिग्दर्शन करून ‘मी फक्त आलो आहे’ याची जाणीव करून दिली नाही. रंजन-अंजन घालणारे, प्रतिभा दाखवणारे दिग्दर्शक असल्याचेही त्यांनी आपल्या कृतीतून पटवून दिले आहे. निर्मात्यांबरोबर प्रेक्षकांची विश्वासार्हता त्यांनी मिळवली आणि त्यातून झुलवा, रणांगण, प्रिया बावरी ही हटके, मराठी रंगभूमीला समृद्ध करणारी नाटके उदयाला आली. या नाटकांनी तुफान लोकप्रियता मिळवली, तर केंद्र हे प्रगल्भ विचारसरणीचे प्रज्ञावंत दिग्दर्शक आहे, हे यातून दिसले.



मुंबई विद्यापीठाच्या अकादमी ऑफ थिएटर ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक पद असा मोठा प्रवास त्यांनी केला आहे. त्यामुळे जगभरातली नाटके काय आहेत, याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. ‘रंगपीठ’ या त्यांच्या स्वतःच्या संस्थेच्या वतीने काही वेगळे करायचे झाले, तर अभ्यासू, संशोधन, विषय, सादरीकरण सारे काही अजब-गजब करणारे असावे, असे त्यांना वाटते. प्रेक्षकांना काय हवे? याहीपेक्षा आपल्याला काही नवीन विषय हाताळता येईल, याचा ध्यास त्यांनी प्रत्येक कलाकृतीत घेतलेला आहे.



‘गजब तिची अदा’ हे केंद्रे यांचे नवीन नाटक गजब करणारी कलाकृती आहे, असे म्हणावे लागेल. त्यांनी दिग्दर्शनाबरोबर या नाटकासाठी लेखन, संगीत हीही जबाबदारी स्वीकारली आहे. निर्माते दिनू पेडणेकर यांच्या ‘अनामिका’ आणि ‘साईसाक्षी’ या संस्थेला सोबत घेऊन ‘रंगपीठ’ या संस्थेने या नव्या नाटकाची निर्मिती केली आहे. गौरी केंद्रे आणि श्रीकांत तटकरे यांचा सुद्धा या निर्मितीत सहभाग आहे. नृत्य, संगीत, गायन यांना प्राधान्य देणारे हे नाटक आहे जे प्रायोगिक रचनेतून सादर केलेले आहे. पूर्वी प्रायोगिक नाटक म्हटले की, त्यांच्यासाठी स्वतंत्र नाट्यगृहे ठरलेली असायची; परंतु पेडणेकर यांनी ती पूर्णपणे संपुष्टात आणलेली आहे. प्रेक्षकांत चर्चा झाल्यानंतर प्रेक्षकच नाटक पाहायला येतो, याची खात्री असलेला हा निर्माता आहे. पेडणेकर यांनी आपल्या निर्मिती अशा नाटकांना अधिक प्राधान्य दिले आहे. मराठी नाटक म्हणजे मनोरंजनाचा एक ठरलेला साचा, असे काहीशी समजूत या क्षेत्रात वावरणाऱ्या रंगकर्मींची, प्रेक्षकांची आहे. त्याला तडा देणारं हे नाटक आहे.



नाटकाची कथा ही महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या राजाची आणि कर्तव्य बजवणाऱ्या सैनिकाची आहे. आपले अस्तित्व आणि श्रेष्ठत्व टिकवायचे असेल, तर युद्ध हे केले पाहिजे, अशा विचारसरणीचा हा राजा आहे. सैनिक या गोष्टीला दुजोरा देत असतात. शंभर युद्ध जिंकल्यानंतर हा राजा रसूदेशवर चाल करण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रत्येक वेळी स्वागतासाठी, विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी राज्यातल्या महिला पुढे सरसावत असतात. पण यावेळी मात्र त्यांनी युद्धाला विरोध करणारे एक आंदोलन छेडले आहे. युद्धात सैनिकांना वीराचे मरण येत असले तरी त्याची झळ सर्वात जास्त त्यांच्या पत्नीला, मुला-बाळांना बसत असते. आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागते. अत्याचार, रूढी, परंपरा यांच्याशी त्यांना सामना करावा लागतो. जगभर हे युद्ध असेच सुरू राहिले, तर भविष्यात पुरुष जात नष्ट होईल, मग नव्या सैनिक निर्मितीचे काय? असा साधा सरळ प्रश्न राज्यातल्या महिलांनी राजाला विचारलेला आहे. महिलांनी एकत्र येऊन तो व्यक्त करणे म्हणजे पुरुषी वर्चस्व या गोष्टीला सहमती देतील, असे नाही. या आंदोलनकर्त्या महिलांना अनेक विचारांतून, समस्यांतून जावे लागते. तेव्हा कुठे अखेर युद्धबंदीचा तिढा सुटतो.



केंद्रे यांनी आपल्या लेखन, दिग्दर्शनात हा विषय मांडताना नृत्य, संगीत, स्फूर्ती-प्रेरणा देणारे काव्य आपल्यासोबत घेतलेले आहे. शिवाय प्रोजेक्टरच्या माध्यमातून आजवरच्या जगभरातल्या युद्धाचे चलचित्र पडद्यावर दाखवून त्याच्या गांभीर्याची जाणीव त्या-त्या वेळी दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना करून दिलेली आहे. यातील महिलांनीच कथेच्या सूत्रधाराची भूमिका बजावलेली आहे. काय केले म्हणजे युद्ध थांबेल. अशी सामूहिक आर्त विनवणी करणे, हा या कथेचा मूळ गाभा आहे. तो प्रत्येकाकडून काव्यातून व्यक्त केला जातो. अनेक तालमी केल्यानंतर ती भाषा, संवाद अवगत होईल, इतके हे कठीण नाटक आहे. केंद्रे यांचे हे आव्हान पंचवीसहून अधिक युवक-युवतींनी समर्थपणे पेलले आहे. याची साक्ष म्हणजे ‘गजब तिची अदा’ हे नाटक सांगता येईल.




नृत्य, संवाद, अभिनय या तिन्ही गोष्टीला प्राधान्य द्यायचे म्हणजे कलाकार हा सराईत असायला हवा. केंद्र हे नाट्य प्रशिक्षक आहेत. रंगपीठाच्या वतीने अभिनय कार्यशाळा ते घेत असतात. गेल्या अनेक वर्षांत ज्या कलाकारांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली, त्या कलाकारांना या नाटकात त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. काही कलाकारांसाठी हे नवे दालन आहे; परंतु हे नाटक पाहताना तसे काही जाणवत नाही. इतक्या उमेदीने यातल्या सर्वच कलाकारांनी उत्तमपणे भूमिका केलेल्या आहेत. राजाची मुख्य भूमिका ऋत्विक केंद्रे यांने केली आहे. अभिनय आणि काव्यसंवाद हे या भूमितीची गरज असल्यामुळे यात कसब दाखवणे, हे आलेच ते त्यांने यशस्वीपणे दाखवलेले आहे. करिष्मा देसले यांनी कलाकार, एक महिला अशा भूमिका केल्या असल्या तरी साकारलेली लक्ष्मी ही लक्षवेधी ठरते. साध्या नेपथ्यरचनेत प्रचंड भव्य राजमहाल दिसेल, असा प्रयत्न नावेद इनामदार यांनी केलेला आहे. शीतल तळपदे यांनी कथानकाला साजेल, अशी प्रकाश योजना केली आहे. उल्लेश खंदारे यांच्या रंगभूषेच्या बाबतीतही हेच सांगता येईल. दखल घ्यावी, अशा तीन गोष्टी येथे घडतात, दिसतात. एक वामन केंद्रे यांचे संगीत, दुसरे अनिल सुतार यांचे नृत्यदिग्दर्शन आणि तिसरे म्हणजे एस. संध्या यांनी केलेली वेशभूषा कमालीची म्हणावी लागेल.

Comments
Add Comment