Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई मेट्रोचे १५०० खांब मेट्रो प्रवाशांना देणार नेटवर्क

मुंबई मेट्रोचे १५०० खांब मेट्रो प्रवाशांना देणार नेटवर्क

एमएमएमओसीएलला पुढील १० वर्षांसाठी अतिरिक्त १२० कोटींचे उत्पन्न

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांना प्रवासादरम्यान नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने ‘लहान/सूक्ष्म दूरसंचार सेल’ धोरण तयार केले आहे. या धोरणाअंतर्गत मेट्रोमार्ग २ अ आणि ७ या उन्नत मार्गावरील ३५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर असलेल्या १५०० खांबांवर दूरसंचार उपकरणे लावण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. यातून एमएमएमओसीएलला पुढील १० वर्षांसाठी तिकिट व्यतिरिक्त अतिरिक्त १२० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल)ने मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांसाठी दळणवळण सेवा प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत पहिले १२ खांब ‘इंडस टॉवर्स’ या आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला देण्यात आले आहेत. ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला आज स्वीकृती पत्र सुपूर्द करण्यात आले. ज्यामुळे पुढील दहा वर्षांत अंदाजे एक कोटी रुपये इतका (१२ खांबांसाठी) अतिरिक्त नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

मेट्रोमार्ग २ए आणि ७ या उन्नत मार्गावरील ३५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर असलेल्या १५०० खांबांवर दूरसंचार उपकरणे लावण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे, प्रवाशांसाठी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या किंवा त्याभागातील रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सोयीस्कर आणि अखंड दळणवळण सेवा सुनिश्चित करणे हा आहे. वरील धोरणाला अनेक टेलेकॉम कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून महामुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या (लहान/सूक्ष्म दूरसंचार सेल) स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत पुढील १० वर्षांसाठी महा मुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिकत येत्या १० वर्षांत सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत महामुंबई मेट्रोने पुढील १५ वर्षांसाठी १५०० कोटींचा नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. या धोरणामुळे महसुलात भर पडणार आहे.

या लहान आणि सूक्ष्म दुरसंचार उपकरण लावण्याच्या धोरणासंदर्भात बोलताना महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले, “हे धोरण प्रवाशांसाठी आणि ‘महा मुंबई मेट्रोसाठी फायदेशीर असून प्रवाशांना प्रवासादरम्यान अखंड नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. मुंबई मेट्रोच्या खांबांवर लहान/सूक्ष्म दूरसंचार उपकरण बसवण्यामुळे महा मुंबई मेट्रोला मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलामुळे मेट्रो प्रवाशांसाठी परवडणारी आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होईल आणि प्रवाशांचा अनुभव अधिक चांगल्या सुविधांसह अधिक समृद्ध करेल.”

या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाशांना आणि लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गाच्या आजूबाजूला राहात असलेल्या लोकांना टेलिकॉम उपकरणाद्वारे अखंड नेटवर्कचा आनंद मिळणार आहे. प्रवासीधार्जिण्या या धोरणातील पहिले स्विकृतीपत्र इंडस टॉवर्सला देत असतानाच इतर इच्छुक कंपन्यांशी लवकरच महा मुंबई मेट्रो भागीदारी करण्यास उत्सुक आहे. हे धोरण म्हणजे ‘मुंबई मेट्रो नेटवर्क’साठी मैलाचा दगड असून अशा अनेक महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी महा मुंबई मेट्रो कटिबद्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -