नागपूर: वाघांची संख्या वाढवण्यासाठी ब्रह्मपुरी येथून आणलेल्या दोन वाघिणींना उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्लीचे अधिकारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व डॉक्टर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (NNTR) वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाचा खोळंबलेला संवर्धन ट्रान्स्लोकेशन प्रकल्प अखेर दोन वाघिणींना पकडल्यानंतर उद्या शनिवारी २० मे रोजी प्रत्यक्षात येणार आहे. त्यासाठी ब्रह्मपुरी येथून आणलेल्या २ वाघिणींना नागझिरा कोअर झोनमध्ये सुरक्षितपणे पोहचविण्यात आले आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा हे अत्यंत घनदाट व आकर्षक जंगल आहे. मात्र हिंसक वाघांच्या स्थलांतरामुळे येथील पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. ९ वाघ व ३ वाघिणी अशी एकूण संख्या १२ आहे. नवेगाव नागझिरा अभयारण्यात समतोल राखण्यासाठी, वाघांचे हस्तांतरण करण्याचा प्रयोग राज्यात प्रथमच केला जात असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे.
नागझिरामध्ये एकूण ४ मादी वाघिणींना सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या २ वाघिणीना अजूनही पकडण्यात यश न आल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प वर्षभराहून अधिक काळ खोळंबला होता. परंतु आता ताडोबातील जलद बचाव पथकाने (RRT) दोन वाघिणींना पुन्हा सोडण्यासाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी १६ मे ला सकाळी गडचिरोलीतील आरमोरी रेंजमध्ये अडीच वर्षांच्या टी-४ वाघीणिला पकडण्यात आले. तिला बुधवारी सकाळी पावणेसात वाजता नवेगाव नागझिराच्या पिटेझरी गेट येथून नागझिरा येथे आणण्यात आले. १४ मे रोजी,ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा रेंजमधून हिरडी नाला वाघिणीच्या मोठ्या झालेल्या एका बछडीलाही पकडण्यात आले. उद्या या दोन्ही वाघिणीना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.