Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार, तापमान वाढणार...

पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार, तापमान वाढणार...

मुंबई (प्रतिनधी) : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही काही काळ राज्याला अवकाळी पावसाने झोडपले. त्यानंतर आता पुन्हा उन्हाचा ताप वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. एकदाचा कधी मान्सून येतो याचीच सारे प्रतीक्षा करत आहेत. मात्र, पुढील आणखी पाच दिवस तरी तापमानाचा पारा असाच आणखी वाढत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जे तापमान कधी फक्त विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला मिळायचे ते आता मुंबईकरही अनुभवत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशांच्या पार गेला आहे.


पण, आता यात आणखी भर पडणार असून पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आधीच उष्णता खूप आहे, त्यात जर आणखी वाढ झाली तर उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू शकते.


गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान वाढले आहे. तर, पुढील पाच दिवस ते आणखी वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाडाच्या तुलनेत तरी इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवेल. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी राज्यातील अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.


यंदाचा उन्हाळा हा अधिक धोकादायक सिद्ध झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यावर्षी उष्माघाताचे १४७७ रुग्ण आढळून आले आहेत. काळजी करण्याचे कारण म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. २०२२ मध्ये उष्माघाताच्या ७६७ प्रकरणांची नोंद झाली होती.

Comments
Add Comment