शाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक
मुंबई : यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी ‘एक रंग एक गणवेश’ धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. १५ जून रोजी शाळा सुरु होतील. मात्र शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाच्या रंगाबद्दल निर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्या गणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी घेतलेल्या बैठकीत गणवेशाबाबतचा निर्णय पुढील एक ते दोन दिवसांत घेतला जाईल, असे माध्यमांशी बोलताना म्हटले होते. मात्र आठवडाभरानंतरही हा निर्णय न आल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची, याबाबत शाळा संभ्रमात आहेत.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. परंतु निर्णयाच्या स्थगितीमुळे यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे.