राफेल नदालने दिले निवृत्तीचे संकेत
माद्रिद (वृत्तसंस्था) : जगातील स्टार टेनिसपटू राफेल नदालने पुढच्या वर्षी टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले. पुढील वर्ष माझ्या कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याचे नदाल गुरुवारी म्हणाला.
फ्रेंच खुल्या स्पर्धेवर नदालची मक्तेदारी असून त्याने तब्बल १४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तो या स्पर्धेचा गतविजेता आहे. दुखापतीमुळे यंदा आपले जेतेपद राखण्याची संधी त्याला मिळणार नाही. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळताना झालेल्या दुखापतीतून नदाल अद्याप सावरू शकलेला नाही.
नदाल म्हणाला की, मला यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलियात मला जी दुखापत झाली होती, त्यातून मी पूर्णपणे सावरलेलो नाही. गेले चार महिने माझ्यासाठी अवघड होते. कोरोनानंतर पुन्हा टेनिस सुरू झाल्यापासून मला तंदुरुस्ती प्राप्त करणे अवघड गेले आहे. त्यामुळे मी काही काळ टेनिसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी महिन्याभराने पुनरागमन करेन किंवा मला चार महिनेही लागू शकतील. मी तारीख निश्चित केलेली नाही. मी शारिरीकदृष्ट्या फार ताण घेणार नाही. पुढील वर्ष माझ्या कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असेल, नदाल म्हणाला.