Friday, July 11, 2025

महाराष्ट्रात फक्त शिवरायांचा पॅटर्न चालणार

महाराष्ट्रात फक्त शिवरायांचा पॅटर्न चालणार

पुणे (प्रतिनिधी): अल्पसंख्याकांचे कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा, कोणताच कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक गुरुवारी पुण्याच्या बालंगधर्व रंगमंदिरात पार पाडली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.


फडणवीस म्हणाले, “सगळे म्हणताहेत की देशात आणि महाराष्ट्रात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. त्यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेत भाजप २८ पैकी किमान २५ जागा जिंकेल. पण तरीही, जे लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार कराल की अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण करून तुम्हाला निवडून येता येईल, पण हे शक्य नाही. कारण या ठिकाणी शिवरायांनी एकेक मावळा तयार केला आहे. त्याला देव, देश, धर्माकरता कसं लढायचं हे माहितेय, त्यामुळे निश्चितपणे भाजपचा मावळा दाखवून देईल. तुम्ही अल्पसंख्याकांचे कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा. लांगूलचालन करून कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. येथे एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल. दुसरा पॅटर्न येथे चालू शकणार नाही.


महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, “आता हे तिघे एकत्रित येताहेत म्हणतात. आज भाजप आणि शिवसेनेची युती अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत. ज्यांनी सरकारकरता विचार सोडले ती शिल्लकसेना महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत पालिका, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभेत निवडून येईल. आपल्या निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदींची कार्यशैली, सामान्यांचा विकासाचा नरेटिव्ह आहे, असंही ते म्हणाले.


शरद पवारांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकात उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ते मी नव्हे तर त्यांच्या घटक पक्षातील नेत्याने केले. त्यामुळे पवार साहेबांचे आभार मानतो. असा टोला लगावत पुस्तकातील ती वाक्ये फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली.

Comments
Add Comment