बावनकुळेंकडून नितेश राणे यांचे जाहीर कौतुक
पुणे : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दररोज होणाऱ्या पत्रकार परिषदेला भाजप आमदार नितेश राणे हे सडेतोडपणे प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊत आणि त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना नितेश राणे यांनी वठणीवर आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरे-तुरे करणारे उद्धव ठाकरे आता मोदीजी-मोदीजी म्हणताहेत. हे नितेश राणे यांचे यश असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणेंचे तोंडभरुन कौतुक केले.
तसेच या पुढच्या काळातही राणे हे काम अत्यंत तडफदारपणे पार पाडतील, असा विश्वास पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बावनकुळे यांनी व्यक्त केला.
“रोज सकाळी सुरू असलेला संजय राऊत यांचा भोंगा नितेश राणे यांनी आवरण्याचा चांगला प्रयत्न सुरू ठेवला आहे. ते केवळ संजय राऊतांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तरच देत नाहीत तर अत्यंत अभ्यासूपणे मुद्दा मांडण्याचे काम करीत आहेत,” अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांचे कौतुक केले.
नागपुरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘अरे- तुरे’ असा केला होता, मात्र राणे यांनी तो मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करत ठाकरे यांना योग्य भाषेत उत्तर दिले. त्याचा परिणाम म्हणून ठाकरेंना मुंबईच्या सभेत मोदी यांचा उल्लेख “मोदीजी, ‘मोदीजी,” असाच करावा लागला, हे राणे याचे यश असल्याची आठवण बावनकुळे यांनी यावेळी सांगितली.