Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेगिर्यारोहक संतोष दगडे यांनी केला माऊंट ‘एव्हरेस्ट’ सर

गिर्यारोहक संतोष दगडे यांनी केला माऊंट ‘एव्हरेस्ट’ सर

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; तिरंगा फडकवत रचला इतिहास

कर्जत (प्रतिनिधी): जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. माऊंट एव्हरेस्ट सर करायला निघालेल्या जगातील २०० गिर्यारोहकांच्या पथकातील पहिली तुकडी बुधवारी १७ मे रोजी सकाळी पोहोचली. जगातील सात गिर्यारोहकांच्या पहिल्या तुकडीमध्ये भारतातील दोन गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले. यामध्ये कर्जत येथील गिर्यारोहक संतोष दगडे यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवत इतिहास रचला.

१ एप्रिलपासून जगातील २०० गिर्यारोहकांची तुकडी माऊंट एव्हरेस्टच्या चढाईवर निघाली होती. त्यात भारतातील १५ गिर्यारोहकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळकडे प्रयाण केले. त्याआधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माऊंट एव्हरेस्टवीरांना शुभेच्छा दिल्या होत्या.

रायगड कर्जत येथील संतोष दगडे, ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथील संदीप मोकाशी, हेमंत जाधव आणि धनाजी जाधव या चौघांनी एकाच वेळी प्रयाण केले होते. काही दिवस हिमालयातील हवामानात झालेल्या बदलामुळे त्यांना चढाई करण्यास थांबावे लागले. १६ मे रोजी वातावरणात झालेला बदल पाहून रात्री बेस कॅम्प चार येथून सात गिर्यारोहकांची तुकडी सर माऊंट एव्हरेस्टकडे कूच केली. या तुकडीने अगदी सकाळच्या पहिल्या प्रहरी माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्या पहिल्या तुकडीमध्ये जगातील सहा देशांचे सात एव्हरेस्ट वीर सहभागी होते. त्यात भारतातून निशा कुमारी आणि संतोष दगडे यांनी एव्हरेस्ट सर केले. तसेच ११ शेरप्पांनी देखील एव्हरेस्ट सर केले. संतोष दगडे यांना शेरपा मिंगमा कर्मा यांची या मोहिमेत साथ मिळाली.

मावळ्याने गाठले शिखर
गिर्यारोहक संतोष दगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापलेला तिरंगा झेंडा फडकवत झेंड्याला अभिवादन केले.

“इथून पुढे सर्व मोहिमेमध्ये मी आणि अन्य तीन साथीदार माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जाणार आहेत”. – संतोष दगडे, गिर्यारोहक, कर्जत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -