नाशिक: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. २१ मे पर्यंत ते नाशिकमध्ये असतील. महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने राज ठाकरे नाशिकमध्ये पुन्हा सत्ता येण्यालसाठी लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरेंचं नाशकात आगमन होणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. याच सोबत शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे विशेष सुचना करतील. त्याचबरोबर उद्या राज ठाकरेंची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.