मुंबई (प्रतिनिधी) : यंदाचा गणपती उत्सव पर्यावरणपूरक व्हावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महापालिकेच्या प्रत्येक विभागात शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी एक जागा मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने पालिका प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करून देणार आहे. २०२३ च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी ४ फूटापर्यंत उंची असणाऱ्या मूर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील ७ दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी गुरुवारी दिले.
२०२३ च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी ४ फूटापर्यंत उंची असणाऱ्या मूर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना महापालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे तसेच यासाठी योग्य जागा शोधण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी गुरुवारी दिले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती काही प्रमाणात मोफत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास बाहेरील राज्यातून देखील शाडूची माती आणून त्याचा मूर्तिकारांना पुरवठा पालिका करणार आहे.
रोषणाईचे रंग देखील पर्यावरणपूरक असावेत…
गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतला. यात मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत सध्या मुंबई शहरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणासाठी रोषणाईचे रंग देखील पर्यावरणपूरक असावेत. झाडांना जी रोषणाई करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रामुख्याने हिरव्या रंगातील विविध छटांचा वापर करावा, असे निर्देश दिले. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजने अंतर्गत आतापर्यंत १५० पेक्षा अधिक ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. अशाच पद्धतीचा ‘आपला दवाखाना’ हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळानजिक देखील सुरू करावा, असे निर्देश त्यांनी दिले.