Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनिर्धार पक्का; मुंबईचा महापौर भाजपचाच...

निर्धार पक्का; मुंबईचा महापौर भाजपचाच…

सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांतील अनपेक्षित विजयानंतर जवळजवळ गतप्राण झालेल्या काँग्रेस पक्षात जान फुंकली गेली आहे आणि एकूणच विरोधी पक्षांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. केवळ कर्नाटकातील विजयानंतर जणू काही यापुढील सर्वच निवडणुका किंबहुना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकाही आपण अगदी सहजगत्या खिशात घालू शकतो इतका आत्मविश्वास विरोधकांमध्ये दिसू लागला आहे. खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत सर्वच आघाड्यांवर केलेले उल्लेखनीय काम पाहिले, तर विरोधक कशाच्या आधारावर भाजपशी दोनहात करण्याच्या गमजा मारत आहेत हे अनाकलनीय आहे.

नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरू शकणारा, त्यांच्या तोडीस तोड असे नेतृत्व विराधी पक्षांकडे सध्यातरी दिसत नाही. मग कर्नाटकातील विजयानंतर कशाच्या आधारावर त्यांच्याकडे बळ आले आहे हे देव जाणे. अशा परिस्थितीत कर्नाटकात फटका खाल्ल्यानंतर भाजपने मात्र हा निकाल गांभीर्याने घेतलेला दिसत आहे. यापुढील छोट्या-मोठ्या अशा कोणत्याही निवडणुकीला पूर्ण तयारीने सामोरे जायचे आणि विजयश्री खेचून आणायचीच असाच होरा या पक्षाच्या सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ, कनिष्ठ अशा सर्वच नेत्यांमध्ये दिसत आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रत्यक्षात काम देखील सुरू केलेले दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने देखील भाजप रणनीती आखत आहे. भाजपला यावेळी मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे, असा त्यांचा मानस दिसत आहे आणि त्यांना शिवसेनेची भक्कम साथही आहे. त्यामुळेच पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबईत दौऱ्यावर असून त्यांनी आल्या आल्याच भाजप मोर्चा आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काही कानमंत्रही दिले आहेत. केंद्र सरकारच्या सर्व लोकप्रिय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर इतरांना जोडण्याचे काम करा. तुमच्या परिसरातील लोकांना भेटा, असे सांगत सरकारची कामे थेट जनतेपर्यंत म्हणजेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावरील या दोन दिवसांत नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात निवडणूक तयारीचा आणि राजकीय परिस्थितीचा आढावाही ते घेणार आहेत. त्यादृष्टीने भाजपची गुरुवारी पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते, आमदार, खासदार आदींसह पदाधिकारीही उपस्थित आहेत.

त्यामुळे आता पुण्यातील बैठकीत विशेष अशी रणनीती आखली जाणार, हे निश्चित. राजाचा जीव पोपटात आहे, हा पोपट कोणता? तर ‘बीएमसी’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच टीका केली. त्यातूनच आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच असा निर्धारही झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. सातत्याने बेकायदेशीर सरकार अशी टीका या शिंदे-फडणवीस सरकारवर होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांचेच सरकार कायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब केले आणि विरोधक तोंडावर आपटले. तत्कालीन शिवसेनेने मुंबई महापालिकेची सुमारे २५ वर्षे सत्ता उपभोगली आणि मुंबई व मुंबईकरांची पुरती गोची करून ठेवली. या काळात पाहिजे तसा विकास झाला नाही. विकासाच्या नावाखाली केवळ स्वत:चे खिसे भरण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आणि कष्टकरी मुंईकरांना हवेवर सोडून पालिकेची नुसती लूट केली. देशातील सर्वात श्रीमंत अशा महापालिकेचे २५ वर्षे कुरण खाऊन ही महापालिका अक्षरश: लुटून खाण्याचे काम करण्यात आले. आता भाजपने मुंबई पालिका ताब्यात घेण्यासाठी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरविले असून या विकासाच्या मार्गानेच ही मोठी महापालिका जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. पुढची ४० वर्षे रस्त्यांवर खर्च करावा लागणार नाही म्हणून मुंबईतील रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहेत. विशिष्ट पक्षांना मुंबई महापालिकेच्या पैशांचा खुराक जोपर्यंत बंद होत नाही, मुंबई महापालिकेची तिजोरी जोपर्यंत मुंबईकरांच्या हाती दिली जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार आता पक्षाध्यक्ष नड्डांसमोर व्यक्त करण्यात आला आहे. तर यापुढील मुंबई महापालिकेचा महापौर हा भाजपचाच असेल अशी घोषणा नड्डा यांनी केल्याने भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली गेली आहे, असेच म्हणायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -