- ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
किती जिव्हाळा आहे या नात्यात! ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले…’ असं हे नातं आहे! अर्जुन स्तब्ध राहातो. त्याच्या या कृतीचा नेमका अर्थ श्रीकृष्णांना कळतो कारण, दोघांतील दोनपण संपून दोघेही एक झाले आहेत.
श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या प्रेमाने ओथंबलेली ज्ञानेश्वरी!
यात श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील नात्याला किती सुंदर पैलू आहेत! एका बाजूने ते गुरू-शिष्य, दुसरीकडे देव-भक्त व तिसऱ्या बाजूने पाहावे, तो दोघे एकरूपच झाले आहेत.
अठराव्या अध्यायात याविषयीच्या अप्रतिम, अर्थपूर्ण ओव्या येतात.
श्रीकृष्ण म्हणतात, “अरे हे आत्मज्ञान, गुप्त असलेल्या माझेही गुप्त ज्ञान आहे. हे ज्ञान जरी इतके योग्यतेचे आहे तरी तू माझा परमभक्त असल्यामुळे तुला न सांगता गुप्त कसे ठेववेल?” ओवी क्र. १३२६
पुढे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन स्तब्ध होतो, गप्प होतो. तेव्हा देव म्हणतात, “अर्जुना, तुझ्या स्वस्थ राहण्याचा अभिप्राय असा आहे की, तुला आणखी एक वेळ पूर्णपणे सांगावे.” ओवी क्र. १३३७
किती जिव्हाळा आहे या नात्यात! ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले…’ असं हे नातं आहे! अर्जुन स्तब्ध राहातो. त्याच्या या कृतीचा नेमका अर्थ श्रीकृष्णांना कळतो, कारण –
कारण उघड आहे, या दोघांमधील ‘दोन’पण, वेगळेपण संपलं आहे. दोघेही एक झाले आहेत. याविषयीची विलक्षण सुंदर ओवी येते.
परी अर्जुना, तुझेनि वेधें। मियां देवपणाचीं बिरुदें।
सांडिलीं गा, मी हे आधें। सगळेनि तुवां॥
ओवी क्र. १३७२
ओवीचा अर्थ – परंतु अर्जुना, मला तुझा जो वेध लागला आहे, त्यायोगाने मी (मियां) देवपणाची बिरुदे टाकून, भक्त झाल्यामुळे अर्धा आहे. तर तू माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तू सगळा आहेस.
किती अर्थ भरला आहे या ओवीत! भक्ताला परमेश्वराची ओढ लागते हे आपण ऐकतो, पाहतो. इथे हा भक्त – परमभक्त अर्जुन आहे. त्याचं श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम आहे. इतकं की श्रीकृष्णांना देखील त्याचा वेध, त्याची ओढ लागली आहे. ही ओढ इतकी आहे की, ते स्वतःचे देवपण विसरले नि भक्त झाले… त्यामुळे जणू पूर्ण/संपूर्ण असलेले देव आपलं देवपण सांडून, टाकून अर्धे झाले आहेत.
इथे ‘सांडणे’ असं अर्थपूर्ण क्रियापद येतं. सांडणं ही क्रिया नकळत होते. देवाचं देवपण/बिरुदे सांडली. त्याच वेळी अर्जुनाला देवांचा छंद, ध्यास लागला आहे. तो ध्यास इतका उत्कट आहे की, तो जणू श्रीकृष्णांशी एकरूप झाला आहे. साक्षात श्रीकृष्णांशी ‘एक’ झाल्यावर त्याच्यातील भक्तपण कसं शिल्लक राहणार? तो ‘अर्जुन राहिला नाही तर तो ‘ईश्वर’मय; नव्हे ‘ईश्वर’च झाला म्हणजे तो ‘संपूर्ण’ झाला!
भक्ताला देवाची ओढ लागणं, देवालादेखील भक्ताचा छंद लागणं नि त्यातून दोघे ‘एक’ होणं! अपुरा असलेला भक्त संपूर्ण होणं तर ‘पूर्ण’ असलेला ईश्वर ‘अर्धा’ होणं हा सारा भक्तीचा प्रवास आहे. परमोच्च प्रवास!
हा प्रवास कसा घडतो, त्याचं सूत्रही श्रीकृष्ण सांगतात. ‘हे पांडुसुता, अगोदर सर्व कर्म ईश्वराला अर्पण करावी म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर आहे, अशी भावना होते.’ ओवी क्र. १३८६
मग माझ्या कृपेने त्याला ज्ञान प्राप्त होते व तो माझ्यामध्ये मिळून जातो.
अर्जुनाला हे जमलं आहे – सर्व कर्म ईश्वराला अर्पण करणं. कर्म करताना ‘मी’पण काढून टाकणं. म्हणून तो ईश्वरमय झाला.
हीच शिकवण अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण मानवजातीला दिली आहे –
कर्म करत राहा ‘मी’पणा टाकून!
कर्म करत राहा ‘मी’पण टाकून!!