- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
पुढील वर्षी दासनवमी उत्सवाकरिता महाराज बाळापुरास बाळकृष्ण बुवांच्या घरी आले. या बाळापूरमध्ये महाराजांचे दोन निस्सीम भक्त होते. एक म्हणजे बाळकृष्ण बुवा आणि दुसरे भक्त होते सुकलाल. त्यावेळी महाराजांसोबत भास्कर पाटील, बाळाभाऊ, पितांबर, गणू, जगदेव, दिंडोकार असे भक्त होते. दासनवमीचा उत्सव छान रीतीने संपन्न झाला.
इथे भास्कर महाराजांच्या दैवयोगाने त्यांना पिसाळलेले कुत्रे चावले. त्यावेळी लोकांना भीती वाटली की, या श्वानदंशामुळे भास्कर आता पिसाळेल. कोणी म्हणू लागले, डॉक्टरांस बोलावणे पाठवा. भास्कर महाराजांची श्री गजानन महाराजांच्या ठायी निस्सीम भक्ती होती. ते म्हणाले, “मला डॉक्टर किंवा वैद्याची जरुरी नाही. माझा डॉक्टर हा आसनावर बसला आहे. मला महाराजांकडे घेऊन चला. त्यांना हा सर्व वृत्तांत सांगा आणि ते जे सांगितली तेच ऐका. आपल्या मनाने काहीही करू नका.”
भास्कर महाराजांचे असे बोलणे ऐकून त्यांना लोकांनी गजानन महाराजांजवळ आणले. बाळाभाऊंनी सर्व समाचार महाराजांना कळविला. तो ऐकून महाराज थोडे हसले आणि म्हणाले, “हत्या, वैर आणि ऋण हे कोणास चुकत नाही. त्याचमुळे हे कुत्रे निमित्त झाले आणि भास्करास येऊन चावले. भास्कराला महाराज बोलले, “भास्करा, तुझे आयुष्य संपले आहे. आता तू मृत्यूलोकास सोडून प्रयाण केले पाहिजेस. तरीदेखील तुला अजून जगण्याची इच्छा असल्यास तसे सांग. मी तुला वाचविन. तुझ्या आयुष्याची वाढ करीन. तुझ्या आयुष्यात ही पर्वणी आली आहे. बोल लवकर. काय विचार आहे तुझा?”
यावर भास्कर महाराज गजानन महाराजांना म्हणाले, “महाराज मी सर्वतोपरी अजाण बालक आहे. जे आपल्याला वाटेल तेच करावे. लेकराचे अवघे हित माताच जाणते. त्यामुळे मी विनंती कशाला करू? आपण ज्ञानाचे सागर आहात.” ऐसे भास्कर महाराजांनी विनम्र भावाने केलेले बोलणे ऐकून गजानन महाराज संतोष पावले. काहीजण महाराजांना असे म्हणाले, “गुरुराया भास्कराला या कुत्र्यापासून वाचवा. तो तुमचा भक्त आहे.” यावर महाराज म्हणाले, “अरे जन्म-मरण ही भ्रांती आहे. कोणी जन्मतही नाही अथवा कोणी मरतही नाही आणि हे कळावे यासाठीच तर शास्त्रकारांनी परमार्थाचा उपाय सांगितला आहे. त्याचा उपयोग करावयास पाहिजे. मोह-मायेपासून स्वतःची समूळ सोडवणूक केली पाहिजे.”
या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी सोप्या रचनेतून, श्री गजानन महाराजांनी सांगितलेले संचित-प्रारब्ध आणि क्रियमाण याबद्दलचे तत्त्वज्ञान मांडले आहे.
संचित म्हणजे – यापूर्वी (आधीच्या अनेक जन्मात करून ठेवलेले पाप वा पुण्य यांचा संचय, यालाच पूर्वसंचित असे म्हणतात.) प्रारब्ध म्हणजे – या जन्मात पूर्वसंचितामधील जो काही थोडासा भाग भोगणे सुरू आहे. (सोप्या शब्दांत, या जन्मात भोगत असलेले नशिबाचे भोग) आणि क्रियमाण म्हणजे – जे सुरू आहे ते. (भगवद्गीतेमधून, उपनिषदातून याबद्दल विस्तृत विवेचन सांगितले आहे.) दासगणू महाराजांनी हेच विवेचन थोडक्या शब्दांत ओवीबद्ध केलेले आहे :
संचित – प्रारब्ध – क्रियमाण।
हे भोगल्यावाचून।
या बद्ध जीवा लागून।
सुटका होणे मुळीच नसे।।३८।।
पूर्वजन्मी जें करावे।
ते या जन्मी भोगावे।
आणि ते भोगण्यासाठी यावे।
जन्मा हा सिद्धांत असे।।३९।।
या जन्मी जे करावे।
ते पुढच्या जन्मास उरवावे।
असे किती सांग घ्यावे।
फेरे जन्ममृत्यूचे?।।४०।।
पूर्वजन्मीचे उर्वरित।
भास्कराचे न उरले सत्य।
तो अवघ्यापून झाला मुक्त।
मोक्षास जायाकारणे।। ४१।।
म्हणून आग्रह करू नका।
मार्ग त्याचा आडवू नका।
काय भास्करासारखा
भक्त राणा जन्मे पुन्हा।। ४२।।
इथे महाराजांनी सांगितले की, भास्कराचे आयुष्य आता अवघे दोन महिनेच उरले आहे. मी त्याच्या आयुष्यात दोन महिन्यांनी वाढ करतो, श्वान विषापासून याला पिसाळू देत नाही म्हणजे तेवढे आयुष्य संपूर्ण होईल. मी जर असे केले नाही, तर याला दोन महिने आयुष्य भोगण्याकरिता पुन्हा जन्म घेऊन पृथ्वीतलावर यावे लागेल. हे म्हणणे कित्येक मंडळींना पटले नाही. पण बाळाभाऊ खूप आनंदित झाले आणि भास्करास बोलले,
भास्करा तू धन्य धन्य।
संतसेवा केलीस पूर्ण।
चुकले तुझे जन्म-मरण।
काय योग्यता वानु तुझी ?।। ५०।।
पुढे भास्कर महाराजांना घेऊन महाराज नाशिक येथे गोदावरी स्नान करण्यास तसेच त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाकरिता गेले. तिथे काळारामाच्या मंदिरात असणारे एक तपस्वी गोपाळदास महंत यांची भेट महाराजांनी घेतली. दोन्ही संतांना अतिशय आनंद झाला. (अशी संतांची भेट होत असताना घडून येणारा भावसंगम अनुभवणे ही जीवनात येणारी पर्वणीच असते.) पुढे झामसिंग राजपूत हे भक्तमहाराजांना हनुमान जयंती उत्सवाकरिता अडगाव येथे घेऊन जाण्याकरिता आले. महाराज भक्त मंडळींना घेऊन अडगाव येथे आले. अडगाव येथे अनेक चमत्कार झाले. तिथे महाराजांनी भास्कराला फुफाट्यात लोळविले. छातीवर बसून भास्कराला ताडले. एके दिवशी महाराज बाळाभाऊंना म्हणाले, “आता भास्कराचे आयुष्य दोनच दिवस उरले आहे. पंचमी दिवशी जाईल तो.” उत्सव पूर्ण झाला. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमी दिवस आला. गजानन महाराज भास्करास म्हणाले,
भास्करा तुझे प्रयाण।
आज दिवशी आहे जाण।
पद्मासन घालून।
पूर्वाभिमुख बैसावे।।१३।।
चित्त अवघे स्थिर करी।
चित्ती साठवावा हरी।
वेळ आली जवळ खरी।
आता सावध असावे।।१४।।
असे सांगून महाराजांनी भास्कर महाराजांना समाधीकरिता सिद्ध केले. भक्त मंडळींना भजन करावयास सांगितले. भास्कर महाराजांनी पद्मासन घालून नसाग्री दृष्टी स्थिर केल्या. अंतर्मुख होऊन सर्व वृत्ती लीन केल्या. उपस्थित भक्तांनी भास्कर महाराजांना माळा घातल्या, बुक्का लावून त्यांचे पूजन केले. हे सर्व सोपस्कार श्री गजानन महाराज दूर बसून पहात होते. सूर्य मध्यान्ही आला असता महाराजांनी मुखाने “हर हर” असा मोठ्याने उच्चार केला. त्यासरशी भास्कर महाराजांचे प्राण वैकुंठाला गेले. नंतर भक्तांनी महाराजांना विचारले की, “भास्करास समाधी कुठे द्यावी?” यावर महाराजांनी “आडगावजवळच असलेल्या परमरमणीय ठिकाणी सतीबाईंच्या जवळ भास्कर यास समाधी द्यावी, असे सांगितले.
भास्कर महाराज हे श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होतेच. एवढेच नव्हे तर ते एक साधन शेतकरी असून संपन्न होते. पण महाराजांनी त्यांच्या शेतामधील निर्जल असणाऱ्या विहिरीला झरा फोडून सजल केले, हा चमत्कार पाहून त्यांनी वैराग्य स्वीकारले तसेच ते सदैव महाराजांच्या सेवेकरिता अत्यंत निष्ठेने महाराजांसोबत राहिले. अशा या आपल्या लाडक्या भक्तास महाराजांनी स्वहस्ते समाधी दिली. सद्गुरूंच्या हस्ते, साक्षात त्यांच्या उपस्थितीत समाधी मिळणे हे परमभाग्य लाखातून एखाद्या भक्तास मिळते. ऐसे भाग्य कोणाचे?
श्री भास्कर महाराज की जय…
क्रमशः