नवी दिल्ली: लव्ह जिहाद या विषयावर भाष्य करणारा ‘द केरळ स्टोरी’च्या पश्चिम बंगालमधील प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर लादण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने दिलेला हा निर्णय ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
याबाबत कोर्ट म्हणाले, “आम्ही ८ मे रोजी पश्चिम बंगाल सरकारने द केरळ स्टोरी या चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत. या बंदीला कोणताही ठोस आधार नाही.” सर्वोच्च न्यायालयातदिलेल्या प्रतिज्ञापत्रात, पश्चिम बंगाल सरकारने म्हटले होते की ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बनावट तथ्यांवर आधारित आहे आणि त्यात द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज या चित्रपटावरील बंदी उठवत पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय स्थगित केला आहे.
‘द केरळ स्टोरी’ ला रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या १३ दिवसांतच चित्रपटाची एकूण कमाई १६५.९४ कोटी इतकी आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘द केरळ स्टोरी’ चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.