Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीलोकसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने देशाची वाटचाल

लोकसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने देशाची वाटचाल

नवी दिल्ली : ‘जन सेवा ही प्रभू सेवा’ – लोकसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने देशाची वाटचाल सुरू आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा येथे ८,००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली तर काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. तसेच पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलेल्या ओदिशामधील, पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी, ओदिशातील रेल्वेच्या जाळ्याचे १०० टक्के विद्युतीकरण, संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अंगुल – सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर – रुरकेला – झारसुगुडा – जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन आणि बिच्छुपली – झरतरभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना आज वंदे भारत एक्सप्रेस भेट स्वरूपात दिली जात आहे; जी आधुनिक आणि महत्वाकांक्षी भारताचे प्रतीक आहे. “जेव्हा वंदे भारत गाडी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी धावते तेव्हा भारताची गती आणि प्रगती दिसून येते” असे सांगत पंतप्रधान म्हणाले की ही गती आता ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पहायला मिळेल. यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या उत्तम अनुभवाबरोबरच विकासाचा अर्थ पूर्णपणे बदलेल. देव दर्शनासाठी कोलकाता ते पुरी प्रवास असो किंवा इतर मार्गाने प्रवास असो, प्रवासाचा वेळ आता केवळ साडेसहा तासांवर येईल, त्यामुळे वेळेची बचत होईल, व्यवसायाच्या संधी वाढतील आणि तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील असे पंतप्रधान म्हणाले. लांबचा प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणाही नागरिकासाठी रेल्वेला पहिली पसंती आणि प्राधान्य असते असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की नजीकच्या काही काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील भारताने विकासाची गती कायम राखली आहे. या काळात प्रत्येक राज्याच्या सहभागाबद्दल त्यांना श्रेय देत पंतप्रधान मोदी म्हणाले की,आपला देश प्रत्येक राज्याला सोबत घेऊन प्रगती करतो आहे.

पंतप्रधान म्हणाले की आता देशात पूर्वीची परिस्थिती राहिलेली नसून नवीन भारत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करु लागला आहे आणि हे तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत देखील आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्रातील भारताची प्रगती हा आता अभ्यासाचा विषय बनला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाते तेव्हा लाखो रोजगार निर्माण होतात आणि रेल्वे आणि महामार्ग संपर्क यंत्रणा तर प्रवास सुलभतेच्या सर्व परिमाणांच्या पलीकडे जाते, यामुळे शेतकरी नवीन बाजारपेठांशी जोडले जातात, पर्यटक, नवीन पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळते.

देश “जन सेवा हीच ईश्वर सेवा ” या भावनेने मार्गक्रमण करत आहे. जिथे शतकानुशतके प्रसाद वाटला जातो आणि हजारो गरीब लोकांना जेवण दिले जाते अशी श्री जगन्नाथ सारखी मंदिरे आणि पुरी सारख्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख त्यांनी केला. त्याच भावनेतून पी एम गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आणि आयुष्मान कार्ड, उज्वला, जल जीवन अभियान आणि पीएम आवास योजना सारखे उपक्रम सुरु करण्यात आले. “आज गरिबांना त्या सर्व मूलभूत सुविधा मिळत आहेत ज्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली” असे ते म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण देशातील प्रगतीचा वेग पुढेही असाच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. या विकासातूनच, आपल्याला नवा आणि विकसित भारत घडवण्याचे पाठबळ मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

यावेळी ओदिशाचे राज्यपाल गणेशीलाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -