Monday, November 11, 2024
Homeताज्या घडामोडीकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

२० मे रोजी शपथविधी, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री पदी डीके शिवकुमार यांच्या नावाची घोषणा काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केसी वेणुगोपाल पुढे म्हणाले की, सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. १३ मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, १४ मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली. ते म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मिळतील, परंतु याला काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरील चर्चा २०२४च्या राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, सिद्धरमय्या यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला. याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -