पुणे(प्रतिनिधि): पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप असल्याने त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना १४ दिवसांची म्हणजेच २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांची आता पॉलिग्राफ चाचणी होणार आहे. जर पॉलिग्राफ टेस्टमध्येही कुरुलकर यांचे तोंड उघडलं नाही तर नार्को टेस्ट घेण्याची तयारीसुद्धा एटीएसने केली आहे.
पाकिस्तानच्या हनीट्रॅप जाळ्यात अडकून डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याने संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. कुरुलकर यांना अटक केल्यानंतर त्यांना ९ तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. त्यांनतर ९ तारखेला त्यांना पुण्यातील शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना १५ तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. कुरुलकर यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना एक दिवसाची एटीएस कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकार पक्षाकडून गेल्या चौदा दिवसात झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला. कुरुलकर यांचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांनी यापुढे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी कुरुलकर यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
त्यानुसार त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कारागृहात घरचे जेवण मिळावे, अशी विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने कुरुलकर यांची विनंती अमान्य केली. कुरुलकर यांना मधुमेह आहे. त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित ओैषधे घ्यावी लागतात. कारागृहात त्यांना ओैषधे उपलब्ध करुन द्यावीत, अशी विनंती ॲड. गानू यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने कुरुलकर यांना कारागृहात ओैषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली. कुरुलकर येरवड्यातील विशेष कक्षात कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांना कैद्यांच्या बराकीत ठेवले जाणार नाही. त्यांना कारागृहातील विशेष कक्षात ठेवले जाणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. गरज भासल्यास कुरुलकरांची कारागृहात चौकशी कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल संचाचा न्यायवैद्यकीय अहवाल सोमवारी (१५ मे) मिळाला. मोबाइल संच कुरुलकर यांच्यासमक्ष उघडण्यात आला. त्यामधील संवेदनशील माहितीचे स्क्रिनशॉट काढण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना गोपनीय माहिती पुरविल्याचा संशय आहे.
राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) पॉलीग्राफ चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. गरज भासल्यास सखोल तपासासाठी कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येईल, असे एटीएसकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.