
केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था): आज ‘सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसासाठीचा दिन असून या निमित्त मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, १८ मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग संचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक आणि एनएमडीसी (मध्य) चे अध्यक्ष राजीव जलोटा देखील यावेळी उपस्थित होते. पवईच्या सागरी प्रशिक्षण संस्थेत या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या दिवसाची यंदाची संकल्पना, “स्त्री पुरुष समानतेसाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे,” अशी आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, या कार्यक्रमासाठी दिलेला विशेष संदेश, दूर दृश्यप्रणाली मार्फत दाखवण्यात आला. या दिनानिमित्त सागरी क्षेत्रात कार्यरत सर्व महिलांना शुभेच्छा देत, त्यांनी महिलांचे या क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. हा दिवस, सागरी व्यवसाय क्षेत्रात महिलांची भरती, त्यांनी या क्षेत्रात टिकून राहावे आणि त्यांना इथे शाश्वत रोजगार मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची संधी आपल्याला देतो, असे सोनोवाल म्हणाले. आज जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘नारी शक्ती’ला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवत आहोत, अशावेळी, ही संकल्पना अधिकच संयुक्तिक ठरते, असे सोनोवाल म्हणाले.
यंदाची संकल्पना सागरी क्षेत्रातील स्त्री-पुरुष असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. तसेच यातून सांघिक भावना आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे महत्त्व अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सागरी क्षेत्रांसह इतर विविध क्षेत्रात महिलांची संख्या वाढवणे आणि त्यांची प्रगती साधण्याला, केंद्र सरकारने कायमच प्राधान्य दिले आहे. सर्व महिलांना समान हक्क मिळावे आणि त्या सक्षम व्हाव्यात, या शाश्वत विकास उद्दिष्टाची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सोनोवाल यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात अधिकाधिक संख्येने महिला खलाशी याव्यात, यासाठी आवश्यक ते सर्व आर्थिक सहाय्य आणि धोरणात्मक पाठबळ देत आहोत. सरकारने या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच, आज भारतीय महिला खलाशांची संख्या, ३३२७ इतकी झाली आहे, असेही सोनोवाल यांनी सांगितले. महिला खलाशांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, सरकारने महिला खलाशांसाठी विशेष तक्रार निवारण व्यवस्था उभी केली आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.
एनएमडीसी चे अध्यक्ष, राजीव जलोटा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर ‘सागरी क्षेत्रात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे’ या विषयावर चर्चासत्रही घेण्यात आले.