Wednesday, May 14, 2025

महामुंबई

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी-२०२३ चे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी-२०२३ चे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

फलटण (वार्ताहर) : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्या वतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ३०व्या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या 'दर्पण' पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या 'दर्पण' सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७व्या पुण्यतिथीनिमित्त (दि. १७ मे) आयोजित अभिवादन कार्यक्रमात केली.



'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'जीवन गौरव पुरस्कार' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना, तर 'साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार' नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक व नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व अभ्यास केंद्राचे संचालक भगवान लक्ष्मणराव अंजनीकर यांना, तसेच कराड येथील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत 'धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार' कृतिका (श्वेता) पालव - मुख्यसंपादिका यांना घोषित करण्यात आला आहे.



राज्यस्तरीय 'दर्पण' पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य पत्रकारांमध्ये प्रशांत कदम नवी दिल्ली, डॉ. सागर देशपांडे कोल्हापूर, श्रीकांत कात्रे सातारा, शशिकांत सोनवलकर फलटण, विक्रम चोरमले फलटण यांचा समावेश आहे.



पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिन दि. ६ जानेवारी २०२४ रोजी पोंभुर्ले, ता. देवगड येथील संस्थेच्या 'दर्पण' सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment