Sunday, May 4, 2025

तात्पर्यसंपादकीय

कोकण हिट ॲण्ड हॉट...!

कोकण हिट ॲण्ड हॉट...!
  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोकणाचं वर्णन साहित्यिक आपापल्या दृष्टीने करीत राहिले आहेत. कोकण म्हटलं की नजरेसमोर येतो तो माडा-पोफळीच्या बागा. सुंदर समुद्र किनारा, काजू, आंब्याच्या बागायती, उंच-उंच डोंगर, गर्द झाडा-झुडपात लपलेले उंच डोंगर यामुळे एप्रिल-मे महिन्यात वाऱ्याच्या एखाद्या येणाऱ्या झुळुकीमुळे निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण असं पूर्वीचं कोकण यापूर्वी अनेकांनी अनुभवले आहे. एप्रिल-मे महिना म्हणजे रणरणते उन्ह आणि अंगावर घामाच्या धारा. अशात कोकणात राहणारा आणि कोकणातून फिरणाऱ्यांनी यापूर्वीही अनुभवले आहे. एप्रिल-मे महिन्यात कोकणात पिकणारा हापूस आंबा, काजू, करवंद, जांभूळ, रायवळ बिटकीचा आंबा या अशा निसर्गदत्त देणगी लाभलेल्या फळांची भारी रेलचेल असायची. आजही ती तशीच असते; परंतु निसर्गातील बदलामुळे या फळांच्या हंगामावरही फारच परिणाम झालेला आहे.

कोकणातील बाजारातून जो आंबा विकला जातोय, तो कर्नाटक हापूस आंबा. पेटीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रद्दी पेपर टाकलेले असतात. यामुळे साहजिकच आपणाला आणि येणाऱ्या पर्यटकांनाही वाटतं की, हा देवगड हापूस आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी आंब्याची विक्री केली जातेय. हे आंबा विक्री करणारे कोण आहेत, हे कोणी कधी पाहत नाही. देवगड हापूस म्हणून कर्नाटक आंब्याची विक्री जशी ती पुणे-मुंबईत होते तशी ती आंबा पिकणाऱ्या कोकणातही होत आहे. यावर्षी कोकणात आंबा पीक फारच कमी झाले आहे. याचाच गैरफायदाही कर्नाटक भागातील आंबा व्यावसायिकांनी घेतला आहे. निसर्गरम्य कोकणात या वर्षीचा उन्हाळा सर्वांना असहृय करणारा आहे. कोकणातील चौपदरीकरण होणाऱ्या महामार्गालगतची जुनी जुनाट झाडं तोडली गेली. महामार्गाच्या या प्रकल्पात हजारो झाडे तोडली गेली. त्या तुलनेत नव्याने वृक्ष लागवड झालीच नाही. राज्याच्या वनीकरण विभागाकडून दरवर्षी हजारो वृaक्ष लागवड केल्याची आकडेवारी शासनस्तरावरून जाहीर होते. प्रत्यक्षात यातली खऱ्याअर्थाने किती वृक्ष लागवड होते, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो. दरवर्षी वृक्ष लागवडीचे अधिकारी आणि सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांचे फोटो छापले जातात; परंतु लावलेल्या रोपांपैकी किती रोपांची वाढ झाली, हे मात्र कधीच कोणाला काही कळल नाही. कळत नसते आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून त्याचा आढावा घेतला जात नाही. गेली काही वर्षे बेसुमार वृक्षतोड केली जातेय. पूर्वीचे गर्द झाडीतले डोंगर उघडे-बोडके झाले आहेत. याची खंत आणि चिंता कोणालाच नाही. जी आजही भरमसाट वृक्षतोड होतेय, त्याची ना कुणाला खंत की कुणाला चिंता. याचा एक ट्रेलर कोकणातील जनता अनुभवत आहे. कोकणात सध्या जी उष्णता वाढली आहे, त्यामुळे ‘यावर्षी इतको उन्हाळो आतापर्यंत आम्ही अनुभवुक नाय.’ या त्याच्या गजाली गावो-गावी होताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळातील नळे आणि कौलारू घरात जो गारवा होता, ती मातीची घरे आणि कौलारू छप्पर या घरातील गारवा पंखे आणि एसीपेक्षाही अधिक आनंद देणारा होता. आज हा आनंद काँक्रीटच्या जंगलात आपण हरवून बसलोय! कोकणातील घराच्या, गावच्या ओढीने मुंबईकर चाकरमानी गावात येतात. गावच्या बंगल्यात राहतात; परंतु अनेकांना त्यांची-त्यांची जुनी घरं आठवली की अस्वस्थ करतात. मग गावात गप्पांमध्ये रंगणारे सर्वजण जुन्या गप्पांमध्ये रंगून जातात. या वर्षीच्या अति उष्म्याने अवघं कोकण हैराण आहे. अर्थात उष्णतेचे प्रमाण एवढं वाढलंय की पुढील काही वर्षांत हा उष्णतेचा पारा कसा वाढत जाईल, याची एक झलक आपण अनुभवत आहोत. कोणतेही उद्योग नसणाऱ्या या कोकणात सावली आणि वारा कुठेच जाणवत नाही. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे, कोकणात यापुढच्या काळात वृक्ष लागवडीवर भर दिला गेला पाहिजे. परंपरागत असणारी जुनीपुराणी झाडे नष्ट होत चालली आहेत. जांभुळाची मोठ-मोठी झाडे आज कुठे दिसत नाहीत.

घर बांधताना छप्परांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला, आज असे मोठाले वृक्ष नाही आहेत. त्याचा परिणामही झाला आहे. अर्थात जो जागतिक वातावरणातील बदल आहे, त्याचा निश्चितच परिणाम सर्वत्रच जाणवू लागला आहे. कोकणाला आपलं कोकणपण टिकवून ठेवायचं असेल तर त्यात काही बदलही अपेक्षित आहेत. त्याकडे आपण सर्वांनीच विशेष लक्ष दिले पाहिजे. या वर्षीच्या उष्णतेने आपणाला जागं केलंय. त्याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी निसर्गापुढे आपण किती शहाणपणा करायचा, हे आपणच ठरवलं पाहिजे. नाहीतर आपलं कोकण ‘हिट अॅण्ड हॉट’मध्ये अग्रभागी होईल. ते होऊ नये म्हणून सर्वांचे प्रयत्न आवश्यक ठरतात.

Comments
Add Comment