जळगाव: सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावरील निर्णयाने सध्याच्या सरकारचे पारडे जड केले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेवर उपाययोजना करण्याबाबत मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटलंय की, जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती समजून उष्माघाताने मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाखांची शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी खडसेंनी केली आहे. आता पत्रावर शासन काय निर्णय घेतं? या पत्राला मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.