Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024दिल्लीचा विजय; पंजाबचा खेळ खराब

दिल्लीचा विजय; पंजाबचा खेळ खराब

रिली रोसोची वादळी खेळी

धर्मशाला (वृत्तसंस्था) : रिली रोसोच्या झंझावाती ८२ धावा आणि पृथ्वी शॉ-डेविड वॉर्नर यांची दमदार सलामी या बळावर दिल्ली कॅपिटल्सने दिलेला २१४ धावांचा डोंगर सर करताना पंजाब किंग्जच्या नाकीनऊ आले. लिअम लिव्हींगस्टोनने ९४ धावा फटकवत किंग्जला विजायची आस दाखवली होती. परंतु तो बाद झाल्यावर पंजाबला गाशा गुंडाळावा लागला. दिल्लीने १५ धावांनी बाजी मारत पंजाबचा खेळ खराब केला. पराभवामुळे पंजाबचे प्ले ऑफ प्रवेशाचे स्वप्न भंगले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या पंजाबला खराब सुरुवात मिळाली असली तरी अथर्व तायडे आणि लिअम लिव्हींगस्टोन या जोडगोळीने किंग्जच्या विजयाची आशा जिवंत ठेवली होती. लिव्हींगस्टोनने ४८ चेंडूंत ९४ धावा फटकवल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ९ षटकार तडकावले. त्याला अथर्व तायडेने छान साथ दिली होती. अथर्वने ४२ चेंडूंत ५५ धावा जमवल्या. तो रिटायर्ड आऊट झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार फटकवले. अथर्व बाद झाल्यावर लिव्हींगस्टोनला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. दिल्लीच्या इशांत शर्मा आणि नॉर्टजे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. पंजाबचा संघ निर्धारित २० षटकांत ८ फलंदाज गमावून १९८ धावांपर्यंतच पोहचू शकला.

तत्पूर्वी रिली रोसोच्या वादळी अर्थशतकाच्या जोरावर दिल्लीने दोन विकेटच्या मोबदल्यात २१३ धावांचा डोंगर उभारला. रिली रोसोने ३७ चेंडूंत नाबाद ८२ धावांची वादळी खेळी खेळली. या खेळीत त्याने ६ षटकार लगावले. पृथ्वी शॉलाही या सामन्यात सूर गवसला. त्याने ५४ धावांची खेळी केली. त्याशिवाय डेविड वॉर्नरने मोलाचे योगदान दिले. वॉर्नरने ४६ धावा जोडल्या. दिल्लीने निर्धारित २० षटकांत २ विकेट गमावून २१३ धावांचा डोंगर उभारला. पंजाबकडून सॅम करन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या. सॅम करनशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -